काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट देखील हॅक

inc
नवी दिल्ली – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे ट्विटर खातेही हॅक झाले असून काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याआधी आक्षेपार्ह ट्विट्स करण्यात आले होते. यानंतर हे ट्विट्स ३० मिनिटांमध्ये हटवण्यात आले. ट्विटर अकाऊंट, संकेतस्थळ हॅक होणे, डिजीटल सुरक्षेवरील मोठे प्रश्नचिन्ह असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले आहे.

राहुल गांधींचे बुधवारी संध्याकाळी ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे आढळून आले होते. यावेळीही आक्षेपार्ह ट्विट्स टाकण्यात आले होते. त्यानंतर ते ट्विट्स काढून घेतले गेले होते. हा संपूर्ण प्रकार अतिशय अनैतिक असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. या सगळ्यामागे फॅसिस्ट विचारसरणी असल्याची टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अशी अनैतिक, खोडसाड कृती करुन राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यातून फॅसिस्टवादी विचारसरणीच्या लोकांची असुरक्षितता दिसते, असे म्हटले आहे. नेमकी कोणती संस्था किंवा संघटना या सर्व घटनांमागे आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा मुद्दा संसदेत आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करणाऱ्यांची संख्या १३ लाख ८० हजार इतकी आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर १२ लाख २२ हजार लोक फॉलो करतात.

Leave a Comment