सर्वसामान्य जनतेच्या जनधन खात्यातील व्यवहारांवर चाप

jan-dhan
नवी दिल्ली – पंतप्रधान जनधन खात्यात नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्याप्रमाणावर पैसे जमा होत असल्याने रिझर्व्ह बँकेने आता या खात्यांच्या व्यवहारांवर काही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता संबंधित जनधन खातेधारकांना महिन्याला त्यांच्या खात्यातून केवळ दहा हजार रूपयेच काढता येणार आहेत. ज्या जनधन खात्यांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांद्वारे रक्कम जमा करण्यात आली आहे, त्याच खात्यांसाठी हा नियम लागू असेल. फक्त केवायसी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ग्राहकांनाच जनधन खात्यातून १० हजार रूपये काढता येणार आहेत. दरम्यान, खातेधारकाला त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी चलनातून हद्दपार केल्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ६५ हजार कोटींचा निधी जमा झाला आहे. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील खात्यामध्ये १० हजार ६७० कोटी जमा झाले आहेत.

नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर देशभरातील जनधन खात्यांमधील ठेवींमध्ये गेल्या पंधरवड्यात तब्बल ३० पटींनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. ८ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान मोदी यांनी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर केवळ १४ दिवसांत या जनधन खात्यांमध्ये तब्बल २१ हजार कोटी इतकी प्रचंड रक्कम जमा झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या अंदाजानुसार ९ नोव्हेंबरपासून जनधन खात्यामध्ये आठवड्याला जमा होणाऱ्या पैशाचा ओघ ३२०० टक्क्यांनी वाढला आहे. ३१ मार्च ते ९ नोव्हेंबर या कालावधीत जनधन खात्यात आठवड्याला जमा होणारी रक्कम ३११ कोटी इतकी होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांच्या सरासरीनुसार हा आकडा १०,५०० कोटींवर गेला आहे. साधारणत: बँकांमध्ये इतकी मोठी रक्कम जमा होण्यास वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, नोटांबदीच्या निर्णयामुळे फक्त १५ दिवसांतच इतक्या मोठ्याप्रमाणावर पैसा बँक खात्यांमध्ये जमा झाला होता.

Leave a Comment