शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांना गुगलची मानवंदना

google
मुंबई – भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांना त्यांच्या १५८व्या जन्मदिवसानिमित्त गुगलने आज खास डुडल तयार केले आहे. यामध्ये जगदीश चंद्र बोस प्रयोगशाळेत दाखविण्यात आले आहेत. या डुडलमध्ये बोस यांनी वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी विकसित केलेले क्रिस्कोग्राफ हे उपकरणही दिसत आहे. वातावरणाचा वनस्पतींवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठीदेखील क्रिस्कोग्राफ उपयुक्त आहे.

जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ जगदीश चंद्र बोस हे होते. जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. कलकत्ता विद्यापीठातून भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर बी.एस.सी करण्यासाठी त्यांनी जगदीश चंद्र बोस केम्ब्रिज विद्यापीठात गेले. १८८४ साली ते भारतात परत आले. विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.

Leave a Comment