येथे रामाचा द्वारपाल म्हणून रावणाची होते पूजा

ramjanaki
देशभरात अनेक ठिकाणी रामसीता मंदिरे पाहायला मिळतात. अर्थात बहुतेक सर्व मंदिरात रामाच्या मंदिरात हनुमानाला स्थान दिलेले असते. छत्तीसगडच्या मुंगेरी जिल्ह्यातील सेनगंगा इथले १८ व्या शतकातले रामजानकी मंदिर मात्र याला अपवाद आहे. या मंदिराच्या दरवाजावर दशमुखी रावणाची प्रतिमा असून त्याला रामाचा द्वारपाल म्हणून पुजले जाते. त्यामुळे राम रावणातील वैर या मंदिरापुरते तरी संपलेले दिसते.

१७५१ मध्ये या मंदिराजवळ एक कुंड बांधले गेले आहे.या मंदिरात काळ्या पाषाणातील रामजानकीच्या अतिशय देखण्या मूर्ती आहेत. प्रथम या मूर्ती कामठी गावात होत्या कारण या प्रदेशाचा राजा दलपतसिंग याची कामठी ही राजधानी होती. नंतर त्याने राजधानी बदलली तेव्हा या मूर्ती त्याच्या महालात ठेवल्या गेल्या व नंतर सेतगंगा येथे सुंदर मंदिर बांधून तेथे स्थापित केल्या गेल्या. दलपतसिंग हा आदिवासी द्रविड राजा रावणाचा उपासक होता. म्हणून त्याने रावणाची प्रतिमा राम मंदिराच्या द्वारपाल जागी स्थापित केली. यामागे रावण राक्षस असला तरी सत्शील होता व विद्वान राजा होता हे त्याचे गुण बाकी समाजाला समजले पाहिजेत तसेच येथे दर्शनासाठी येणार्‍यांनी अहंकाराला मूठमाती द्यावी अशी त्याची इच्छा होती असे सांगतात.

या मंदिराच्या गर्भगृहातील खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम केले असून ते करताना दिशांचे अचूक भान ठेवले गेले आहे. आवर्जून भेट द्यावे असे हे मंदिर आहे. त्यापुढेच स्वामी नारायणाचे मंदिरही आहे.

Leave a Comment