न.प. निवडणुकीचा संकेत

election
महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका या आता तशा फार सूचक नव्हत्या. म्हणजे त्यावरून आगामी कोणत्याही निवडणुकीचे अंदाज बांधावेत अशी स्थिती नव्हती. परंतु महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार जनतेला पसंत पडला आहे का हे या निवडणुकीवरून लक्षात येईल असे नक्कीच समजले जात होते. तसा विचार केला तर फडणवीस सरकार या परीक्षेला बर्‍यापैकी उतरले आहे. शिवसेनेनेही बरी कामगिरी केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र नगराध्यक्ष पदांच्या बाबतीत मागे पडले आहेत. या निकालाने महाराष्ट्रातली राजकीय हवा नेमकी कोणत्या दिशेने वाहत आहे याचे संकेत मिळाले आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकांच्या निवडणुकांवरून राज्यातली सत्ता हाती येऊ शकेल की नाही याचा काही अंदाज येत नसतो. कारण राज्याच्या विधानसभेची निवडणूक वेगळ्या मुद्यांवर होत असते आणि नगरपालिकांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्यांवर होत असते.

अनेकदा काही राज्यांमध्ये विधानसभेच्या काही दिवस आधीच पंचायत निवडणुका होतात आणि पंचायत निवडणुकांत ज्या पक्षांना चांगले यश मिळते त्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत त्या प्रमाणात यश मिळत नाही. असे असले तरी त्या पक्षाची पाळेमुळे तळागाळात किती खोलवर गेली आहेत याचे दिग्दर्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून नक्कीच होत असते. नगरपालिकांच्या १४६ निवडणुका आता पार पडल्या असून त्यातल्या २८ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद भाजपाला मिळाले आहे. १९ नगराध्यक्ष पदे शिवसेनेला, चौदा पदे राष्ट्रवादीला आणि १७ पदे कॉंग्रेस पक्षाला मिळाली आहेत. या सार्‍या नगरपालिका विसर्जित झाल्या तेव्हाची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे याची तुलना केली असता भाजपाने बरीच मुसंडी मारली असल्याचे लक्षात येते. विसर्जित नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्या क्रमांकावर होती. कॉंग्रेसचा दुसरा क्रमांक होता, भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेचा चौथा क्रमांक होता. पण आताची स्थिती पाहिली असता भाजपाचा पहिला क्रमांक आला आहे आणि आधी पहिला क्रमांक असलेल्या राष्ट्रवादीचा क्रमांक तब्बल चौथा झाला आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या स्थानात फार मोठा फरक पडला नसला तरी शिवसेनेच्या चार जागा वाढलेल्याच आहेत आणि कॉंग्रेसच्या चार जागा कमी झालेल्या आहेत. म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असून भाजपा आणि शिवसेनेने आपल्या जागा वाढवण्यात यश मिळवलेले आहे.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत आणि त्यांना सत्तेचा लाभ मिळून एवढ्या जागा मिळू शकल्या आहेत. ही गोष्ट नाकारता येत नाही. अर्थात केवळ विधानसभेतली सत्ता हाती आहे म्हणून नगरपालिका जिंकता येतीलच याची काही शाश्‍वती देता येत नाही. पण त्यातून त्या पक्षाची पाळेमुळे तळागाळात रुजण्यास मदत होते ही गोष्ट नाकारता येत नाही. या बाबतीत भाजपाचे यश दखल घेण्यायोग्य आहे. कारण शिवसेनेचा संघटनात्मक ढाचा तळागाळात चांगलाच तयार झालेला आहे. भाजपाचा तसा तो नाही. भारतीय जनता पार्टी हा शहरी पक्ष आहे. त्याला ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही असा आजवरचा अनुभव आहे. मात्र या निवडणुकीत ही स्थिती बदलली असून भाजपाला या निमशहरी भागात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपाला अशा निवडणुकांमध्ये उमेदवारसुध्दा मिळणे मुश्किल होते. राज्यातल्या कित्येक नगरपालिकांमध्ये भाजपाचा एकही सदस्य नाही अशी अवस्था होती. आता भाजपाने २८ नगराध्यक्ष पदे जिंकली आहेतच पण कित्येक नगरपालिकांमध्ये भाजपाचे सदस्य उपस्थिती लावण्याइतपत का होईना पण नव्याने निवडून आले आहेत.

वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर अनेक नगरपालिकांत भाजपाने यंदा पहिल्यांदाच खाते उघडले आहे. भाजपाला मिळालेला हा कौल नेमका राज्यातल्या भाजपा सरकारच्या कारभारामुळे किंवा दिल्लीतल्या मोदी सरकारच्या कामगिरीमुळे मिळालेला आहे की काय असाही प्रश्‍न चर्चेला येतो. त्याचे निःसंदिग्ध उत्तर तर देता येत नाही. पण काही प्रमाणात काही लोकांनी भाजपात प्रवेश केला, ते भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी अनेक नगरपालिकांमध्ये चंचुप्रवेश केला ही गोष्ट काही प्रमाणात भाजपाच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या कामगिरीमुळे नक्कीच झालेली आहे. ज्या गावात भाजपाला उमेदवार मिळत नव्हते त्या गावातल्या काही कार्यकर्त्यांनी आपण आता भाजपात प्रवेश केला पाहिजे असा विचार केला ही गोष्ट मोदी सरकारच्या कारभारामुळे घडली आहे हे नाकारता येणार नाही. अशा रितीने काही भागात चंचुप्रवेश करून भाजपाला आपले स्थान राज्यात बळकट करता येऊ शकेल या निवडणुकीत शिवसेनेचे यशसुध्दा दखल घेण्यायोग्य आहे. भाजपाशी युती न करता निवडणूूक लढवून शिवसेनेने हे यश मिळवलेले आहे. भाजपा आणि सेना यांनी युती केली असती तर १४६ पैकी निदान ७०-८० नगरपालिकांत तरी या युतीचे वर्चस्व दिसून आले असते. पण तरीही प्रत्येकाला आपली ताकद किती आहे हे तपासून बघण्याची उत्सुकता असतेच. ती उत्सुकता या दोन्ही पक्षांची पूर्ण झाली आहे.

Leave a Comment