देवाच्या लग्नालाही नोटबंदीची झळ

vishnu
केंद्राने मोठ्या नोटा बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणी आल्या त्यात लग्नघरातही कॅश रकमेअभावी फारच पंचाईत झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो आहोत. ही अडचण केवळ माणसांनाच नाही तर देवाच्या लग्नातही अडसर बनल्याचे मध्यप्रदेशातील रतलाम जवळच्या नामली गावात अनुभवास येत आहे. सोमवारी त्याबाबत कांही तरी तोडगा काढला जाणार असल्याचेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार नामली गावात दरवर्षी विष्णु व तुळशीचे लग्न लावण्याची जुनी परंपरा आहे. चारभुजानाथ विष्णु व तुळशीचा विवाह येथे अनेक वर्षे साजरा केला जातो व सर्व गाव त्यात सामील होत असते. हा उत्सव म्हणजे गाव एकीकरणाचा, समाजजागृतीचा एक मार्ग असल्याचे गांवकरी सांगतात. लग्नात विष्णु वरात घेऊन येतात, सर्व गावभर वरात फिरते व तुळशीशी विष्णुंचा विवाह झाला की लग्नाची मेजवानी दिली जाते. कुमावत समाज ही प्रथा पाळतो. त्यांचे बँकेत खाते आहे व त्यातून पैसे काढून हा समारंभ साजरा होतो.

सरकारने लग्नासाठी अडीच लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सवलत दिली आहे. मात्र त्यासाठी वधू वर किंवा मुलामुलीचे आईवडील त्यांच्या खात्यातून रक्कम काढू शकतात त्यासाठी पत्रिका द्यावी लागते. या समाजाने विष्णु तुळशीच्या लग्नाची पत्रिका छापली पण विष्णु, तुळस किंवा त्यांचे जे कोणी असतील ते आईवडील यांचे खाते बँकेत नसल्याने ही रक्कम देण्यास अधिकारी तयार नाहीत. लग्नासाठी संस्था व समाज किंवा कुण्याच्या व्यक्तीगत खात्यातून पैसे काढता येणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. या विरोधात गांवाने आंदोलन छेडण्याचा विचार चालविला असून त्याअगोदर सोमवारी रिझर्व्ह बॅकेशी संबंधित बँकेतले अधिकारी बोलणार आहेत असेही समजते.

Leave a Comment