मध्य परदेशात हजार वर्षांपूर्वीची प्रचंड लांबीची भिंत

wall
चीनच्या भिंतीचे नाव जागतिक आश्चर्यात कोरले गेले आहे. मात्र याच धर्तीवर सुमारे १ हजार वर्षांपूर्वी बांधलेली ८० किमीपेक्षा जास्त लांबीची प्राचीन भिंत भारतातही अस्तित्त्वात असल्याचे पुरातत्त्व तज्ञ सांगतात. ही भिंत १० व्या ११ व्या शतकात बांधली गेली असून ती मध्यप्रदेशाच्या रायसेन जवळच्या जंगलात आजही अस्तित्त्वात आहे. अर्थात आता ती भग्न स्वरूपात आहे मात्र तेथे आजही अनेक दुर्मिळ मूर्ती, घरांचे अवशेष, बांधीव तलाव पाहयला मिळतात.

भोपाळपासून २०० किमी गोरखपूर गावाजवळच्या जंगलात या भिंतीचे अवशेष आहेत. पुरातत्त्वतज्ञ डॉ.नारायण व्यास यांच्या मते भारतातील ही सर्वात जुनी व सर्वाधिक लांबीची भिंत असावी. मध्यप्रदेश रायसेन जिल्ह्यातील उदयपूरच्या गोरखपूर जंगलात ही भिंत असून भोपाळ पासून १०० किमीवरच्या बाडी बरेलीपर्यंत तिची लांबी आहे. विंध्याचल पर्वतातील दाट जंगलात परमार काळात बांधली गेलेली ही भिंत प्रामुख्याने शत्रूपासून संरक्षणासाठीच बांधली गेली असावी.

या काळात येथे परमारवंशाचे राज्य होते व शेजारी असलेल्या कल्चुरी वंशातील शासकांबरोबर त्यांची नेहमीच युद्धे होत असत व त्यामुळे आक्रमणांपासून संरक्षण म्हणून ही भिंत बांधली गेली असावी. याच भागात शिव, विष्णु, भैरव व सूर्यमंदिरही पाहायला मिळते. ही मंदिरे पंचायतन पद्धतीत बांधली गेली आहेत. भिंत बांधताना इंटरलॉकिंग पद्धतीचा वापर केला गेला आहे व ती लाल दगडात बांधली गेली आहे. तिची रूंदी १५ फुटांपासून २४ फुटांपर्यंत आहे तर उंची १५ ते १८ फूट आहे. या भागात अनेक विहीरी, तलाव, मंदिरे, हमामखाने व घरांचे अवशेष पाहायला मिळतात. म्हणजे त्या काळात हे चांगले नांदते गाजते राज्य असावे असा अंदाज करता येतो.

या भागात अनेक दुर्मिळ मूर्तीही सापडल्या होत्या पण त्यातील अनेक चोरीस गेल्या आहेत. ज्या भग्नावस्थेत आहेत त्या जतन केल्या गेल्या आहेत. आजकालत या भिंतीचे दगडही चोरी होऊ लागले असल्याचे समजते. या भागात ८ फूट उंचीची २० हात असलेली भैरवाची मूर्तीही सापडली होती तीही चोरीस गेल्याचे समजते.

Leave a Comment