दोन दिवस नागरिकांना एटीएमचा आधार

atm
मुंबई: आजपासून (शनिवार) सलग दोन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची सगळी भिस्त ही एटीएमवरच असणार आहे. केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर नागरिकांनी बँकांच्या दारात एकच गर्दी केल्यानंतर बँकांवरील वाढलेला ताण यांमुळे बँकांसमोरील रांगा वाढतच गेल्या. या रांगा आता काहीशा कमी झाल्या असल्या तरी, नागरीकांची गैरसोय होणे आजही टळले नाही.

केंद्र सरकारने नोटबंदीच्या निर्णयासोबतच नागरिकांना स्वत:च्या बँक खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवरही मर्यादा घालून दिल्यामुळे चलनबदल आणि बँकांतून पैसै काढणे या गोंधळात अधिकच भर पडली. त्यातच नोटा बदलल्या तसेच चलनात दोन हजारांची नोट आली. मात्र, त्या तुलनेत १००रूपयांच्या तसेच, ५०, २०, १०, ५ रूपयांच्या नोटाही उपलब्ध न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय निर्माण झाली. त्याचा परिणाम लघुउद्योजक, भाजीविक्रेते, शेतकरी कामगार मजूर यांच्या वर झाला. सुट्टे पैसे आणि नोटा बदलून घेण्यासाठी व काही मंडळी पैसे काढण्यासाठी हातातला कामधंदा बाजूला सारून बँकांच्या दारांत रांग लाऊ लागली. त्यामुळे अवघा देश बँकांच्या दारात उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले.

दरम्यान, सध्या परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्याचे चित्र असले तरीही सलग सुट्ट्यांमुळे एटीएमबाहेरची रांग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ज्या मंडळींना प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करायचा आहे, अशा मंडळींना दोन दिवस वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जुन्या नोटा असतील, ज्यांना रोख रक्कम अकाऊंटला जमा करायची आहे. तसेच, ज्यांना चेक थेट बँकेत जमा करायचा आहे. अशा मंडळींना सोमवारचा दिवस उघडण्याची वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान एटीएममध्ये असलेला पैशांचा तुटवडा, त्यात एटीएमसमोरील गर्दी हे कमी की काय़ म्हणून एटीएम मधून काढल्या जाणाऱ्या पैशांबाबतही गोंधळ आहे. कारण, एटीएममधून पैसे काढताना दोन हजाराची नोट येऊ नये यासाठी लोक त्यापेक्षा कमी रक्कम काढत आहेत. कारण एटीएममधून पैसै काढताना दोन हजाराची नोट आली तर, सुट्टे कोणाकडे मागायचे हा प्रश्न लोकांसमोर आहे. त्यामुळे हातात पैसे असून, ही लोकांना फायदा होताना दिसत नाही. लोकांच्या समस्या कायम आहेत.

Leave a Comment