जनधन योजना फुगली

jan-dhan-yojna
मुंबई – जनधन खात्यात ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर जमा करण्यात आलेल्या रकमेची आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली असून जनधन खात्यात गेल्याच आठवड्यात १५ दिवसात २१ कोटी रूपये जमा झाल्याची माहिती होती. पण आता ही आकडेवारी वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जुन्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात ६४,२५२.१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

सरकारने चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा हद्दपार केल्यानंतर बँकांसमोरील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. बँकिंग क्षेत्रावरही या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील खात्यामध्ये १० हजार ६७० कोटी जमा झाले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांचा नंबर लागतो. केंद्र सरकारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, जनधन योजनेतील राशी स्पष्ट करण्यात आली.

लोकसभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेतील २५.५८ कोटी खात्यामध्ये ६४ हजार २५२ कोटी जमा झाले आहेत. लोकसभेमध्ये राज्याच्या अनुषंगाने माहिती देताना उत्तर प्रदेशमध्ये ३.७९ कोटी खात्यांमध्ये १० हजार ६७० रुपयांची राशी जमा झाली आहे. जन धन खात्याच्या अंतर्गत पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर असून तेथील २.४४ कोटी खात्यांमध्ये ७ हजार ८२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थानमध्ये १.८९ खात्यामध्ये ५ हजार ३४५.५७ कोटी राशी जमा झाली आहे. बिहारमध्ये २.६८ कोटी खात्यांमध्ये ४ हजार ९१२.७९ कोटी धन राशी जमा झाली आहे.

Leave a Comment