५० दिवस नाही तर ४ ते ५ महिने अजून करावी लागणार नोटांसाठी ओढाताण

note5
नवी दिल्ली – देशभरातील सर्वसामान्य जनता सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या ‘रांगे’त आलेली असताना, ही बातमी त्याच नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. देशात पुढील चार ते पाच महिने नोटांचा तुटवडा जाणवेल, असे द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. पूर्ण क्षमेतेने नोटा तयार करण्याचे काम देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी केले तरीही बँकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड असल्याचे या फेडरेशनने म्हटल्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकांमधील आणि एटीएममधील रांगा तूर्ततरी कमी होण्याची शक्यता नाही.

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी चलनातून बाद करण्याची घोषणा केली. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी लोकांनी बँकांसमोर रांगा लावायला सुरुवात केली.

५०० आणि २००० रुपयांची नवी नोट सरकारने बाजारात आणली आहे. पण त्याचा आवश्यक तेवढा पुरवठा बँकांकडे होत नाही. त्यामुळे रोकड पैशाने व्यवहार करण्यात लोकांची अडचण होते आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांवर २४x७ नव्या नोटांच्या छपाईचे काम सुरू असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. पण त्यानंतरही बँकांकडे आवश्यक चलन उपलब्ध होत नसल्याची तक्रार बॅंक अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येते आहे.

पुढच्या आठवड्यात नवा महिना सुरू होतो आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बँकांपुढील अडचणीत आणखीनच वाढ होईल, असेही फेडरेशनने म्हटले आहे. वेतन झाल्यामुळे अनेक खातेदार मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी बँकांपुढे गर्दी करणार आहेत. पण त्याचवेळी बँकांना आवश्यक चलन न मिळाल्यास गोंधळात जास्तच भर पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment