नाशिकच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये १२ दिवसांत ३०० दशलक्ष नोटांची छपाई

note1
नाशिक – नोट बंदीवर नाशिकरोड येथील मुद्रणालयाच्या सहकार्याने मात केली गेली असून ३०० दशलक्ष नोटांची छपाई १३ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली आहे. आगामी काळात १०, २०, ५० आणि ५०० रुपयांच्या छपाईत दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. नाशिकरोड मुद्रणालयातील यंत्रणा जुनी झाल्याने त्यांच्या आधुनिकीकरणाची गरज प्रेस मजदूर संघटनेने व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत ही माहिती प्रेस मजदूर संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. नाशिकच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये उच्च दर्जाचा कच्चा माल आणि आधुनिक यंत्रणा उपलब्ध केल्यास देशाच्या चलन छपाईत नक्कीच भर पडेल. मुद्रणालय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग यांनी या संदर्भात पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी येथील मुद्रणालयास भेट देत मजदूर संघाशी चर्चा केली. मुद्रणालयातील छपाई व तत्सम यंत्रणा जुनी झाली अजून आजपर्यंत त्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंत्रणा मध्येच बंद पडत असून सध्या कामाच्या ताणामुळे हे प्रमाण वाढले आहे.

दुसरीकडे यंत्रणांच्या आधुनिकीकरणाची गती संथ आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दोन्ही मुद्रणालयाला उच्च दर्जाची शाई मिळते. ती शाई परदेशातूनही आयात करण्याची त्यांना परवानगी आहे. नाशिकरोड मुद्रणालयात मात्र भारतीय शाई वापरली जाते. चलन, गोपनीय तसेच महत्त्वाची कागदपत्रे तयार करण्यात आघाडीवर असलेल्या ‘ब्रिटिश डे’ कंपनीला महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे जागा दिली आहे. ही कंपनी ३६ देशांच्या नोटा सध्या छापत आहे. या कंपनीला चलन व अन्य महत्त्वाची सुरक्षा कागदपत्रे छापण्याची परवानगी न देता ती नाशिकरोड केंद्राला द्यावी, अशी मागणी गोडसे यांनी केली. कामगारांना लक्षांक भत्ता मिळावा, सातवा वेतन आयोग त्वरित मिळावा, नवी कामगार भरती करावी आदी मागण्या गर्ग यांच्यासमोर बैठकीत करण्यात आल्या.

चलन कल्लोळानंतर कामगारांनी दररोज जादा काम केले. दोन रविवारी सुटी घेतली नाही. त्याबद्दल गर्ग यांनी कामगारांचे कौतुक केले. कामगारांना सुटय़ा नोटांची समस्या भेडसावत आहे. त्याची दखल घेऊन सरकारने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कामगारांना दोन दिवसात वेतनापोटी दहा हजाराची रक्कम रोख मिळणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. चेन्नईसाठी विमानाने ५०० चे पाच दशलक्ष, शंभराच्या सहा दशलक्ष, तर वीसचे एक दशलक्ष चलन पाठविण्यात आले. भविष्यात दोन हजार रुपयांचे चलन छापण्याची मागणी आल्यास त्याची पूर्तता केली जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.

Leave a Comment