जिओने पाठविले ग्राहकाला २७ हजार रुपयांचे बिल

jio
मुंबई – आपली वेलकम ऑफर लाँच करत टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओने एकच खळबळ उडवून दिली. आपल्या ऑफरमध्ये ग्राहकांना जिओने फ्री वॉईस कॉल, फ्री रोमिंग सोबतच इतरही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांनी जिओचे सिमकार्ड घेण्यासाठी अक्षरश: रांग लावली. मात्र, सध्या जिओचे एक बिल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तब्बल २७ हजार ७१८ रुपयांचे बिल कोलकातामधील जिओच्या ग्राहकाला आले असल्याचे यात म्हटले आहे.

२७ हजार ७१८ रुपयांचे बिल जिओच्या एका ग्राहकाला आले असुन फ्री देण्यात आलेली सेवा आता जिओ अशा प्रकारे ग्राहकांकडून वसुल करणार असा मेसेज आणि बिल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या जिओ ग्राहकाचे नाव अयुनुद्दीन मोंडल असे असुन त्याने ५५४ जीबी डेटा वापरला असल्याचेही बिलात म्हटले आहे. सोशल मीडियात व्हायरल होणा-या या बिलामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिओचे बिल सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर रिलायन्स जिओने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. रिलायन्स जिओने म्हटले आहे की, जिओची सेवा मोफत आहे, कुठल्याही प्रकारचे बिल आकारण्यात आलेले नाही. हे बिल बनावट असून या प्रकरणी कोलकात्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या बिलामध्ये २७ हजार ७१८ रुपये बिलाची रक्कम देण्यात आली असुन बिल भरण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर असल्याचे म्हटले आहे. तसेच २० नोव्हेंबरनंतर १ हजार १०० रुपये दंड आकारून २८ हजार ८१८ रुपये बिल भरावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment