सीबीआय, रिलायन्स चालतात २१ वर्षीय त्रिशनितच्या इशार्‍यावर

aroda
शाळेत नापास पण जगभरातील ५०० हून कंपन्यांना आपल्या इशार्‍यावर चालवू शकणार्‍या त्रिशनित अरोरा या २१ वर्षीय युवकाची कहाणी मोठी रोचक म्हणावी लागेल. त्रिशनित हा एथिकल हॅकर म्हणून काम करतो आणि त्याच्या टीएसी सिक्युरिटी कंपनीचा व्यवसाय आज करोडो रूपयांचा आहे. त्रिशनितने हे यश अवघ्या २२ व्या वर्षातच मिळविले आहे.

एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रकचरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल,पंजाब पोलिस, गुजराथ पोलिस, एवन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या टीएसी सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. त्रिशनितला पहिल्यापासून संगणकात खूपच स्वारस्य होते व त्यापायी शाळेत आठवीत असताना हेकींगच्या नादात त्याने दोन पेपर दिले नाहीत परिणामी त्याच्यावर आठवी नापासचा शिक्का बसला. त्याचे वडील अकौंटंट. मुलाचे हे उद्योग त्यांना व परिवाराला कधीच आवडले नाहीत मात्र त्रिशनित हेच आपले करियर करायचे यावर ठाम होता.

आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परिक्षा दिली.एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कंपनी स्थापन केली व अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट आले आहेत. द हॅकींग एरा, हॅकींग वुईथ स्मार्टफोन्स,व हॅकींग टॉक त्रिशनित अरोरा ही त्याची पुस्तकेही तुफान लोकप्रिय ठरली आहेत.पंजाब सरकारने त्याचा २०१४ ला खास सन्मान केलाच पण २६ जानेवारी २०१५ला त्याला पंजाब आयकॉन म्हणूनही गौरविले आहे. त्रिशनित आता त्याचा व्यवसाय यूएसमध्ये सुरू करण्याच्या प्रयत्नात असून व्यवसायाची उलाढाल २ हजार कोटींवर नेण्याची आशा बाळगून आहे.