या गणेश मंदिराचा बिभिषणाशी आहे संबंध

ganesh
तमीळनाडूतील तिरूचिरापल्ली किंवा त्रिची येथे असलेले उच्ची पिल्लयार रॉक फोर्ट गणेश मंदिर हे थेट रामायण काळाशी संबंध सांगणारे म्हणून जगात प्रसिद्ध आहे. या गणेशाचा रावणाचा भाऊ बिभिषण याच्याशी थेट संबंध असल्याचे मानले जाते. उंच पहाडावरील या मंदिरात जाण्यासाठी ४०० हून अधिक पायर्‍या चढाव्या लागतात. अर्थात मंदिरात गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचे विलोभनीय दर्शन होते हा आणखी एक प्लस पॉईंट म्हणता येईल.

या मंदिराची कथा अशी सांगतात की रावणाला ठार केल्यानंतर रामाला या युद्धात मदत केलेल्या व रामाचा भक्त असलेल्या रावणाच्या भावाला म्हणजे बिभिषणाला रामाने विष्णू रूपातली रंगनाथ मूर्ती दिली. ही मूर्ती घेऊन बिभिषण लंकेत तिची स्थापना करणार होता कारण रावणानंतर हे राज्य बिभिषणाला मिळाले होते. मात्र बिभिषण राक्षस कुळातील असल्याने त्याला ही मूर्ती लंकेत नेता येऊ नये अशी देवांची इच्छा होती व त्यासाठी त्यांनी गणेशाची मदत मागितली. ही मूर्ती नेताना एक अट होती, ती म्हणजे जेथे ही मूर्ती जमिनीवर ठेवली जाईल तेथेच ती स्थापित होईल.

बिभिषण मूर्ती घेऊन लंकेकडे जात असताना त्रिचीला पोहोचला व तेथे कावेरी नदी पाहून त्याला नदीत स्नान करण्याची इच्छा झाली. मात्र हातातील मूर्ती जमिनीवर ठेवता येणार नव्हती यासाठी तो कुणी दिसते का हे पाहात असताना गणेश बालरूपात तेथे आले. बिभिषणाने गणेशाच्या हाती मूर्ती देऊन त्याला ती जमिनीवर न ठेवण्याची सूचना देऊन स्नानासाठी उतरला तेवढ्यात गणेशाने ती मूर्ती जमिनीवर ठेवली. यामुळे रागावलेल्या बिभीषणाने गणेशाचा पाठलाग केला तेव्हा गणेश या पहाडावर चढला पण पुढे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तेथेच थांबला. बिभिषणाने रागाच्या भरात या गणेशाच्या डोक्यावर वार केला. मात्र वार करताच गणेशाने खरे रूप दाखविले तेव्हा बिभिषणाने त्याची क्षमा मागितली. आता मंदिरात स्थापन असलेल्या मूर्तीच्या डोक्यावर या वाराची निशाणी पाहता येते.

Leave a Comment