‘चेतक’ला रिलाँच करणार बजाज

chetak
मुंबई – भारतीयांच्या मनावर आणि रस्त्यांवर कधीकाळी अधिराज्य गाजवणारी बजाज चेतक पुन्हा एकदा बाजारात परतणार असून भारतीय बाजारात १९७२ मध्ये दाखल झालेली बजाज चेतक ही देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्कूटर्सपैकी एक आहे. बजाज कंपनीने २००६ मध्ये चेतक स्कूटरचे उत्पादन थांबवले. बजाज कंपनीने २००२ मध्ये फोर स्ट्रोक इंजिन असलेल्या चेतकची निर्मिती केली होती.

या स्कूटर्सची मागणी देशभरात वाढत असल्याने बजाज पुन्हा एकदा स्कूटर उत्पादनाकडे वळणार असून बजाजकडून स्कूटर विभागातील ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी चेतक रिलाँच करण्यात येणार आहे. चेतक संपूर्ण नव्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह २०१७ मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता असून होंडा ऍक्टिवा १२५ आणि टिव्हीएस जुपिटरकडून चेतकला मोठी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे.

बजाजकडून अद्याप कोणतीही माहिती चेतकच्या लॉचिंगबद्दल जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बजाज चेतकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, आरामदायी सस्पेन्शन, सीटखाली जास्तीत जास्त साठवण क्षमतेसह अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये असणार आहेत. चेतकच्या सीट्स लेदरच्या असतील, असे चेतकच्या छायाचित्रावरुन दिसून येते आहे. चेतकला ग्लॉसी रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याचा अंदाज छायाचित्रावरुन व्यक्त करण्यात येत आहे.

चेतक नव्या हेडलॅम्प क्लस्टर, इंडिकेटर्ससह बाजारात दाखल होईल. बजाज चेतक फोर स्ट्रोक इंजिनसह १२५ सीसी किंवा १५० सीसी प्रकारात उपलब्ध असेल. जुन्या चेतकपेक्षा शक्तीशाली इंजिन आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स नव्या चेतकची वैशिष्ट्ये असणार आहेत.

Leave a Comment