चीन प्रवेशासाठी फेसबुककडून सेन्सॉरशीप टूल?

censor
चीनमध्ये फेसबुकसह अन्य सोशल मिडीयावर २००९ पासून लादलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी फेसबुकने सेन्सॉरशीप टूल आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या टूलमुळे फेसबुकवर टाकल्या जाणार्‍या पोस्ट फिल्टर करून मगच टाकल्या जातील. अर्थात फेसबुक युजरकडून या टूलला आत्ताच विरोध सुरू झाला असला तरी संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने मात्र या टूलचे समर्थन केले आहे. फेसबुककडून या टूलसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही मात्र न्यूयॉर्क टाईम्सला फेसबुकमधील कांही कर्मचार्‍यांनी नांव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

फेसबुक प्रवक्तयाने चीन त्यांच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने मोठा बाजार असल्याचे मान्य करून चीनमध्ये प्रवेशासाठी आम्ही चीन समजून घेतोय असे म्हटले आहे तर झुकेरबर्गनेही चीनचा बाजार भारतासारखाच आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. मार्क गेले अनेक दिवस चीनची भाषा मँडरीन शिकतोय, चीनी नेत्यांच्या भेटी घेतोय व चीनचा दौराही त्याने केला आहे.

चीनमध्ये मिडीयावर सध्या सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. बाहेरच्या सर्व सोशल साईटसवर तेथे बंदी आहे.सरकारविरोधात कोणतेही मत सोशल मिडीयावर येऊ नये यासाठी ही काळजी घेतली गेली असून फेसबुकवर बंदीमागेही हेच कारण होते. कारण तेथील नागरिक फेसबुकवर सरकार विरोधातील पोस्ट टाकत होते. सेन्सॉरशीप टूल मुळे युजरने सरकार विरोधात पोस्ट टाकली तरी ती फिल्टर केली जाईल व त्यामुळे थेट फेसबुकवर ती पोस्ट येऊ शकणार नाही. यामुळे फेसबुकला चीन प्रवेश सुकर होईल अशी कंपनीला आशा आहे.

Leave a Comment