१५ दिवसांत ‘जनधन’ खात्यात जमा झाले तब्बल २१ हजार कोटी

jan-dhan-yojna
नवी दिल्ली – ८ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर लोकांकडून बँकेत जुन्या नोटा अजूनही मोठ्याप्रमाणात भरण्यात येत आहे. अद्याप बँकांसमोरील गर्दी कमी झालेली नाही. बँकिंग क्षेत्रावरही या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील १५ दिवसांत तब्बल २१ हजार कोटी रूपये जमा झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून ‘जनधन’ खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे.

केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागावी यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली होती. शून्य बॅलन्सने खाते या योजनेतंर्गत उघडण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर या खात्यात आजपर्यंत २१ हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे सरकारने जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरही लक्ष ठेवले आहे. ज्या खात्यात सर्वाधिक रक्कम जमा होत आहे. त्यांना प्राप्तिकर खात्याकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत.

बोगस नोटांचा धंदा आणि काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी त्याच मध्यरात्रीपासून सुरू झाली. या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून आणि बँक खात्यात जमा करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या. या रांगा अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीत. या रांगा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरुच आहे. पुढील ५० दिवस नागरिकांना त्रास होईल, पण भविष्यात त्याचा फायदाच होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. मोदींच्या निर्णयाचे सर्वसामान्यांतूनही स्वागत होत आहे. विरोधकांनी संसद अधिवेशनातही सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षाकडून संसद व संसदेबाहेरही सरकारचा निषेध करण्यात येत असून. बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी जंतर-मंतरवर आंदोलनही केले. ममता बॅनर्जींनी या वेळी केंद्र सरकारचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

Leave a Comment