आरबीआय ५००-१००० च्या जुन्या नोटांचे करणार काय ?

note
नवी दिल्ली : ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा मोदी सरकारने चलनातून रद्द केल्याने नव्या नोटांचे बँकांना वाटप करण्यासोबतच जुन्या नोटांची योग्य विल्हेवाट लावण्याचेही आव्हान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर आहे.

तब्बल २० अब्ज ५०० आणि १०००च्या नोटांची रद्दी होणार आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, भारतीय बाजारात २०१६मध्ये ९० अब्ज नोटा (छोट्या-मोठ्या सर्व) चलनात आहेत. म्हणजेच एकूण नोटांमधील ३५ टक्के नोटा नष्ट कराव्या लागणार आहेत. नोटांचे उत्पादन आणि वापरासंदर्भात जगात सर्वात मोठा देश चीन आहे. विशेष म्हणजे याच यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नोटांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आरबीआयसाठी फार मोठी गोष्ट नाही. कारण आरबीय वेळोवेळी फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा नष्ट करत असते. किंबहुना, जगभरातील देशांच्या मुख्य बँकांकडे अशा नोटा नष्ट करण्याची जबाबदारी असते.

जुन्या नोटांना कंप्रेस करुन त्यांचे रुपांतर पुठ्ठ्यांमध्ये करते. त्यानंतर हे पुठ्ठे इंधन म्हणून वापरासाठी कारखान्यांना देते. मात्र, आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नष्ट केलेल्या नोटांपासून तयार झालेले पुठ्ठे इंधन म्हणून वापरासाठीही योग्य नसतात. नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया आरबीआयच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्येच होत असते. आरबीआयच्या कार्यालयामध्ये नोटा कापण्याची मशिन्स असतात. या मशिनद्वारे नष्ट करावयाच्या असलेल्या नोटा कापल्या जातात. आरबीआयच्या देशभरातील १९ कार्यालयांमध्ये नोटा कापण्यासाठीच्या २७ मशिन्स आहेत. या मशिन्सद्वारे सुरुवातील नोटांचे तुकडे केले जातात. त्यानंतर कंप्रेस करुन पुठ्ठ्यांमध्ये रुपांतरित केले जाते. अनेकदा हे पुठ्ठे जमिनीत पुरले जातात.

अनेकदा असे होते की, नोटांच्या तुकड्यांचे रिसायकलिंग करुन त्यांच्यापासून फाईल्स, कॅलेंडर किंवा पेपर वेट इत्यादी वस्तूही बनवल्या जातात. अमेरिकेमध्ये तर नष्ट करावयाच्या नोटांपासून वेगवेगळ्या वस्तू केल्या जातात. अधिकाऱ्यांच्या मते, २० अब्ज नोटा नष्ट करणे, ही काही मोठी गोष्ट नाही. प्रत्येक वर्षी आरबीआय अब्जावधी रुपयांच्या नोटा नष्ट करते. २०१५-१६ मध्ये १६ अब्ज नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या. २०१२-१३ मध्ये चलनातून ५ लाखांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. त्यावेळीही १४ अब्ज नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment