आरबीआयकडून कर्जफेडीसाठी ६० दिवसांची मुदतवाढ

rbi
मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा दिला असून कार, घर तसेच अन्य कारणासाठी बँकाकडून १ कोटीपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना कर्ज परत फेडीसाठी आरबीआयने ६० दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ दिली आहे. गृह, वाहन, कृषी तसेच अन्य कर्जधारकांनाही चलनबदलामुळे निर्माण झालेल्या रोकडटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला.

गृह कर्जासह शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना देखील रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे १ नोव्हेबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई झाल्याच्या कारणावरुन थकबाकीदाराचा शिक्का कर्जदारावर बसणार नाही. देशातील आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना हा मोठा दिलासा दिला आहे. यादरम्यान तुम्ही ईएमआय भरू शकला नाहीत तरी तुमच्यावर बँक कोणतीही कारवाई करणार नाही.

ही सवलत एक कोटी रुपयांपर्यंतचे गृह, कार, कृषीसह सर्व प्रकारच्या कर्जांवर असेल. बिझनेस, पर्सनल, सिक्युअर्डसह सर्व कर्जे या योजनेत येतील. एक कोटी रुपयांपर्यंतच्या वर्किंग कॅपिटल खातेधारकांनाही सवलत मिळेल. सर्व बँका व बिगर बँकिंग संस्थांच्या कर्जांना ही सवलत असेल.

सरकारने शेतकरी व व्यापाऱ्यांनाही दिलासा दिला आहे. आता शेतकरी ५०० च्या जुन्या नोटांवर बियाणे खरेदी करू शकतील. ओळखपत्र देऊन किसान केंद्रे व राज्य सरकारच्या विविध केंद्रांवर जुन्या नोटा चालतील. दुसरीकडे कॅश क्रेडिट (सीसी) आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना ५० हजारांपर्यंत रोख काढण्याची सवलत देण्यात आली आहे.

Leave a Comment