नोटाबंदीबाबत विरोधकांकडून दिशाभूल: मोदी

jaitly-and-modi
नवी दिल्ली: नोटाबंदीचा निर्णय सरकारने देशहितासाठी घेतला असूनही विरोधकांकडून या निर्णयाबाबत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

ऐन हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. चलन तुटवड्यामुळे जनताही त्रासली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री जेटली यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची बैठक आयोजित केली.

काळा पैसा साठवून बसलेले लोक, भ्रष्टाचारी आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय प्रभावी ठरणार असल्याचा दावा करून पंतप्रधान म्हणाले की; या निर्णयाचे दूरगामी परिणाम देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरतील.

या बैठकीत पंतप्रधान भावूक झाल्याचे दिसून आले. या निर्णयाला ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणू नका; असे आवाहन त्यांनी केले. लक्षवेधी कारवाई ही शूर वीर जवान प्राणांची बाजी लावून करतात. त्यामुळे या निर्णयाची त्यांच्याशी तुलना करू नका; असे ते म्हणाले.

नोटाबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय हा अत्यंत धाडसी निर्णय असून या निर्णयामुळे देशातील गरिबीवर मात करणे शक्य होणार आहे; असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत बोलताना केला.

देशातील जनतेने प्रामाणिकपणे कर भरल्यास सरकारला दरवर्षी कर्जस्वरूपात उभारावे लागणारे पैसे कर्जाऊ घ्यावे लागणार नाहीत; असे जेटली यांनी यावेळी सांगितले. सध्या देशात १६ लाख कोटी रुपयांचे करसंकलन होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

नोटाबंदीचा निर्णय हा अत्यंत मोठा आणि महत्वाचा असल्याचे सांगून जेटली यांनी असा निर्णय घेण्यास मोठे धाडस लागत असल्याचे सांगितले. या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले आहे. संसदेत या निर्णयाबद्दल चर्चा करण्यास आपण तयार आहोत; असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment