उत्तर प्रदेशात नवी आघाडी

up
उत्तर प्रदेशात पूर्वीच्या काळी चौधरी चरणसिंग ही एक मोठी राजकीय शक्ती होती. उत्तर प्रदेशातला आणि त्यातल्या त्यात पश्‍चिम उत्तर प्रदेशातला जाट समाज त्यांच्यामागे एकमुखाने उभा राहत असे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे वर्चस्व असे पर्यंतच्या काळात कॉंग्रेसशी टक्कर देईल अशी चरणसिंग ही एकमेव राजकीय शक्ती होती. चरणसिंग यांनीही आपल्या पाठीशी उभा असलेला जाट समाज आणि ज्याचा उल्लेख पिछडा समाज असा केला जातो असा वर्ग संघटित करून आपली शक्ती एवढी वाढवली होती की ते १९७७ साली देशाचे उपपंतप्रधान होऊ शकले. त्यांना पंतप्रधान होण्याचीही संधी मिळाली पण ही संधी मिळतानाचे राजकारण फार विचित्र झाले होते आणि इंदिरा गांधींनी त्यांना फसवून त्यांचे पंतप्रधानपद काढून घेतले. पण चरणसिंग यांना प्रभावी राजकारण करता आले ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यांचे चिरंजीव अजितसिंग यांना मात्र जाट समाज त्यांच्या मागे वडिलांच्याइतकाच सक्षमपणे उभा असूनसुध्दा फार प्रभावी राजकारण करता आलेले नाही. कारण उत्तर प्रदेशात चरणसिंग यांना पर्यायी असेे नेतृत्व मुलायमसिंग यादव यांनी दिले आहे.

अजितसिंग मात्र केवळ आपली जाट मतपेढी सांभाळून अन्य पक्षांशी प्रत्येकवेळी नवी युती करून केवळ संधीसाधू राजकारण करत आहेत. अजितसिंग हे राजकारणात सक्रीय झाल्यापासून कॉंंग्रेस, भाजपा, सपा, बसपा अशा जवळजवळ प्रत्येक पक्षाशी कधी ना कधी युती केलेली आहे. भारतीय जनता पार्टी केेंद्रात सत्तेवर असताना त्यांनी भाजपाशीही युती केली आणि त्या बदल्यात हवाई वाहतूक खाते आपल्या पदरात पाडून घेतले. आपल्या पाठीशी मोठा जनसमुदाय उभा असतानासुध्दा अजितसिंग अशारितीने केवळ वैयक्तिक लाभाचे राजकारण करत असतात. त्यामुळे त्यांची प्रचंड फरपट होत आहे. आता ते याच क्रमाने येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जनता दल (यू) च्या मागे फरपटत चालले आहेत. जनता दल (यू) हा पक्ष पूर्वी भाजपाच्या रालो आघाडीत होता. परंतु नितीशकुमार यांच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याविषयी किलमीश निर्माण झाले आणि त्यापोटी त्यांनी भाजपाशी असलेली युती मोडली. त्यांचा पक्ष बिहारपुरता मर्यादित आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या पक्षाला काहीही स्थान नाही. परंतु तरीही त्यांनी उत्तर प्रदेशात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आणि मुलायमसिंग यादव यांचा पदर धरून विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव मांडला.

मुलायमसिंग यादव यांच्या पक्षात आणि घराण्यात दुफळीचे वातावरण असताना त्यांनी कधीतरी न्यूनगंडापोटी जनता दल (यू) शी युती करण्याची तयारी दाखवली होती. पण आता त्यांच्या त्यांच्या कुटुंबातली यादवी संपल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुलायमसिंग यांचा आत्मविश्‍वास वाढला असून त्यांनी जनत दल (यू) फटकारले आहे. परिणामी फटकारलेले जनता दल (यू) नेते आणि सतत कोणाच्या ना कोणाच्या मागे फरपटत जाणारे अजितसिंग या दोन, निरुपाय झालेल्या पक्षांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत एक नवी आघाडी निर्माण केली आहे. खरे म्हणजे अजितसिंग, मुलायमसिंग, लालू प्रसाद, शरद यादव, रामविलास पासवान, नवीन पटनायक, देवगौडा, हरियाणातले चौताला हे सगळे एकाच समाजवादी पार्टीचे नेते आहेत आणि जनता दल नावाच्या पार्टीत १९९० पर्यंत हे सुखाने नांदत होते. परंतु ९० नंतरच्या मंडल आयोगाच्या पार्श्‍वभूमीवरील बदललेल्या राजकारणामध्ये या सगळ्यांची फाटाफूट झाली आणि दिल के टुकडे बिखर जाये तसे दल के टुकडे बिखर गये आणि आता हे सगळे समाजवादी, लोहियावादी नेते एकमेकांचे तोंडही बघायला तयार नाहीत. संघटन कौशल्याचा अभाव आणि वैयक्तिक अहंकार यापोटी जनता दलाची अशी वाताहत झाली. पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या एकेका नेत्याने आपल्या राज्यापुरते वर्चस्व प्रस्थापित केले आणि जनता दलाचा राष्ट्रीय दरारा संपुष्टात आला.

तरीसुध्दा उत्तर प्रदेशाच्या निमित्ताने सगळ्या लोहियावाद्यांनी एकत्रित यावे अशी धडपड सुरू झाली होती. परंतु अशा एकीकरणामध्ये नेहमीच नवे प्रश्‍न निर्माण होतात. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मुलायम सिंग, लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी एकत्र येण्याचे ठरवले होते. परंतु मुलायमसिंग यांनी ऐनवेळी आपण या एकीकरणात नसल्याचे जाहीर करून टाकले. आताही नितीशकुमार उत्तर प्रदेशात येऊ इच्छितात आणि तिथे लोहियावाद्यांचे एकत्रिकरण होऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आणि सुरूवातीला एकीकरणाचे संकेत देणारे मुलायमसिंग यादव फिसकटले. त्यांनी कालपर्यंत युती किंवा एकीकरण या पैकी कोणत्याही पध्दतीने सार्‍या मोदी विरोधकांना एकत्रित आणण्याचे संकेत दिले होते. पण आज नेमकी त्याच्या विरोधात कृती केली. या सार्‍या घटनांमुळे नितीशकुमार यांच्या मोदी विरोधकांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्नांना सुरूंग लागला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतले सारे चित्र अशारितीने नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना अनुकूल होत आहे.

Leave a Comment