दुर्दैवी अपघात

accidenty
इंदूर ते पाटणा या मार्गावर धावणार्‍या एक्स्प्रेसचे १४ डबे एकदम रूळावरून घसरून झालेल्या अपघातत १२० प्रवाशी मृत्यूमुखी पडले आणि २०० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. या अपघातामध्ये गाडीचे तर मोठे नुकसान झालेच कारण रेल्वेचे डबे रुळावरून घसरण्याचे अनेक प्रकार घडतात परंतु एकदम १४ डबे रुळावरून घसरणे हे अपघाताचे गांभिर्य लक्षात आणून देणारी आहे. या अपघातात रुळावरून घसरलेल्या १४ डब्यांपैकी पहिल्या चार डब्यांचा तर पूर्णपणे चेंदामेंदा झाला. पण काही डबे एकमेकांवर चढले आणि काही डबे रुळावरून घसरून लांबवर फेकले गेले. पहाटे तीन वाजता अपघाता झाला. त्यामुळे प्रवासी अगदी गाढ झोपेत होते. तेव्हा त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही खटपट करण्याचेही भान नव्हते. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात उत्तर प्रदेशातल्या पुखराया या स्थानकाजवळ घडला. म्हणजे रेल्वे मध्य प्रदेशातून बिहारमध्ये चालली होती आणि अपघात उत्तर प्रदेशात झालेला आहे. गेल्या काही वर्षातील सर्वात भीषण अपघात असे याचे वर्णन केले जात आहे.

असा अपघात झाला की रेल्वेमंत्र्यांनी चौकशीची घोषणा करणे आणि कारणांचा शोध घेणे हा उपचार सुरू होतोच. त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जपानमध्ये जाऊन आले आणि तिथे त्यांनी ताशी ३०० किलोमीटर वेगाने धावणार्‍या बुलेट ट्रेनबाबत वाटाघाटी पुढच्या टप्प्यावर नेल्या आहेत. देशात अशी अती वेगवान गाड्यांची चर्चा सुरू आहे. दिल्ली ते मुंबई हे सध्याचे १७ तासांचे वेगवान गाडीचे अंतर ११ तासांवर आणणारी रेल्वे गाडी नुकतीच धावली. तिचा वेग ताशी १३० किलोमीटर असा पडला. अशा प्रकारे रेल्वेच्या वेगाच्या बाबतीत देशातले रेल्वे खाते काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा रेल्वे अपघात झाला. त्यामुळे आता लोकांना, वेगवान रेल्वे हव्यातच कशाला असा प्रश्‍न विचारण्याची सोय झाली आहे आणि ती साहजिक आहे. कारण काल अपघात झालेली इंदूर-पाटणा एक्स्प्रेस ही सुपरफास्ट रेल्वे होती आणि ती ११० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावत होती. रेल्वेच्या अपघाताची चौकशी तर होणार आहेच. पण तूर्तास काही अनुमान प्राथमिक स्तरावर काढले जात आहेत आिण या क्षेत्रातले तज्ञ लोक दोन शक्यता व्यक्त करत आहेत. एक म्हणजे गाडीच्या रुळात फटी पडल्या होत्या आणि दुसरे कारण म्हणजे मुळात रेल्वेत काहीतरी बिघाड होता.

सध्या तरी या दोन्हीही शक्यतांना दुजोरा दिला जात आहे. कारण रेल्वे चालवणार्‍या मोटारमनने रेल्वेतल्या बिघाडाविषयी आपल्या अधिकार्‍यांना कल्पना दिली होती. म्हणजे याचा अर्थ रेल्वेचा बिघाड माहीत होता. शिवाय अपघाताच्या २० मिनिटे आधी रेल्वेच्या चाकांचा विचित्र आवाज येत होता असे काही प्रवाशांनी सांगितले आहे. म्हणजे गाडीत काहीतरी बिघाड होता परंतु त्या बिघाडाकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे हा अपघात झाला. याच कारणाने अपघात झाला असेल तर हा अपघात पूर्णपणे मानवनिर्मित आहे, असे म्हणावे लागेल. परंतु काही तज्ञ मंडळी अपघाताच्या या कारणाला दुजोरा देत नाहीत. रेल्वेतल्या त्या विशिष्ट बिघाडामुळे अपघात झाला असेल तर तो एवढा भीषण होऊ शकत नाही. चौदा डबे रुळावरून घसरावेत आणि डब्यांचा एवढा चेंदामेंदा होऊन काही डबे एकमेकांवर चढावेत एवढा गंभीर स्वरूपाचा अपघात या बिघाडामुळे शक्य नाही. परंतु दुसर्‍या काही तज्ञांच्या मते असा अपघात या बिघाडामुळे होऊ शकतो कारण अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग ११० किलोमीटर प्रतितास असा होता आणि या वेगामुळे अपघाताचे गांभिर्य वाढले आहे.

अपघात या बिघाडामुळे घडला की नाही हा मुद्दा बाजूला ठेवून बिघाडाविषयी चौकशी झालीच पाहिजे आणि बिघाड असूनही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र त्यामुळे अपघाताचे दुसरे काही कारण असेल तर त्याचीही चर्चा झाली पाहिजे. हे दुसरे कारण म्हणजे रेल्वेच्या रुळात फडलेली फट. रुळात पडलेल्या अशा फटींची पाहणी करणारे काही कर्मचारी नेमलेले असतात. मात्र सध्या आपल्या रेल्वे यंत्रणेत ही पाहणी म्हणाव्या तेवढ्या गंभीरपणाने होत नाही. कारण पाहणी करणार्‍या कर्मचार्‍यांच्या अनेक जागा दीर्घकाळपासून मोकळ्या आहेत. गाड्यांची संख्या वाढते. रेल्वेचे नवे रुळ टाकण्याचे काम होत आहे. परंतु कर्मचारी कमी होत आहेत. अशा स्थितीत अपघाताशिवाय काहीच घडू शकत नाही. रेल्वेने कर्मचार्‍यांची संख्या कमी केली असेल आणि तिथे कमी केलेल्या माणसाची जागा संगणकाने भरून काढली असेल तर या कामात केलेली काटकसर योग्यच आहे. परंतु रेल्वेच्या रुळाची पाहणी करण्याचे काम माणसाऐवजी संगणक करू शकत नाही. तिथे माणसेच भरली पाहिजेत. पण नको तिथे काटकसर केल्याने रुळांची पाहणी होत नाही आणि पाहणी न झाल्यामुळे असे अपघात होतात. याही कारणाने अपघात होऊ शकतो परंतु तो एवढा भीषण नसतो. या कारणाने अपघात झाला असला तरी त्याचे गांभिर्य वेगामुळे वाढलेले आहे. एकंदरीत आपल्या रेल्वेगाड्यांचा वाढता वेग आपल्याला पेलवणार आहे का हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

Leave a Comment