जास्त कॅश जमा करणाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस

income-tax
मुंबई – प्राप्तीकर विभागाने (आईटी) नोटबंदीनंतर बँकांमध्ये जास्त रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली असून अशा प्रकारच्या नोटीस पश्चिम बंगालच्या सिलुगुडी आणि सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. संबंधितांकडे मोठी कॅश जमा करण्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. गुरुवारी अर्थमंत्रालयानेही बँका आणि पोस्ट ऑफिसेसना नोटिफिकेशन पाठवून कोणत्याही अकाऊंटमध्ये दिवसाला ५० हजार आणि ३० डिसेंबरपर्यंत २.५ लाखापेक्षा अधिक जमा केल्यास त्याबाबत आयटी विभागाला माहिती देण्याचे निर्देश दिली होते.

आयकर विभागाचे अधिकारी, सहायक आणि डेप्युटी कमिश्नर आता कोणत्याही करदात्याची फाइल स्वतः स्क्रुटनीला घेऊन कमाई आणि खर्चाचा पूर्ण हिशेब मागू शकतात. याबाबत सीबीडीटीने १६ नोव्हेंबरला नोटिफिकेशन सादर केले होते. आधी कॉम्प्यूटर असेसमेंट स्क्रूटनी सिस्टम (कास) मध्ये समोर येणाऱ्या ठरावीक फाइलच असेसमेंट ऑफिसरकडून असेसमेंटसाठी घेतल्या जात होत्या. साधारणपणे या सिस्टीममध्ये १०० पैकी दोन तीन फाइल असेसमेंटसाठी जायच्या. असेसमेंट ऑफिसरला एखाद्या फाइलमध्ये गडबड वाटली तरच डिपार्टमेंटचे चीफ कमिश्नर किंवा प्रिंसिपल कमिश्नर यांच्या परवानगीने ती फाइल उघडता येत होते. आता अधिकाऱ्यांना ही मंजुरी घ्यायची गरज राहणार नाही. अशा वेळी ते त्यांच्या अख्त्यारीत येणाऱ्या कोणत्याही करदात्याच्या फाइलची स्क्रुटनी करू शकतात.

सर्व सीएंनी करदात्यांसाठी हा अत्यंत कठोर निर्णय असल्याचे सांगितले आहे. ३० डिसेंबरनंतर याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यादरम्यान बँकांकडूनही आयटी डिपार्टमेंटला कोणी कोणी खात्यात अडीच लाखापेक्षा अधिक जमा केले याची माहिती मिळू शकेल. त्यावेळी अधिकारी करदात्याला त्याचा हिशेब विचारू शकेल.

Leave a Comment