आपल्या खात्यावर जमा करू नका मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पैसे

note
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशा विरोधात मोहीम उघडत जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा बाळगून बसणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. यामुळे आपल्याकडील काळा पैसा नियमित करण्यासाठी इतरांच्या बँक खात्याचा वापर करत आहेत. मात्र, दुस-याचे पैसे आपल्या खात्यात जमा करुन त्यांना मदत करणा-यांना चांगलेच महागात पडू शकते.

अनेकजणांनी आपल्याकडील काळा पैसा नोटाबंदीच्या निर्णयानंतर इतरांच्या बँक खात्यात जमा करत आपला पैसा नियमित करण्याची शक्कल काढली आहे. मात्र, अशा नागरिकांना मदत करणा-या व्यक्तींवर अर्थ मंत्रालय कारवाई करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

आपल्या मित्र, नातेवाईकांच्या बँक खात्यात काळा पैसा बाळगणारे व्यक्ती पैशांचे आमिष दाखवून आपल्याकडील काळा पैसा डिपऑझिट करत आहेत. पैशांच्या लोभापोटी अनेकजण त्यांना होकारही देत आहेत. तुम्हीही अशीच मदत करण्याच्या विचारात आहात तर आताच सावध व्हा… कारण, दुस-याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी सूचना जारी केली आहे.

ट्विट करत अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, दुस-यांचे पैसे आपल्या बँक खात्यांमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. नागरिकांनी दुस-या व्यक्तीचे पैसे आपल्या खात्यावर जमा करुन घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच त्यांना काळ्या पैशावर कर आणि दंड भरावा लागेल. जी व्यक्ती आपल्या खात्याचा इतरांना दुरुपयोग करु देत आहे. त्या व्यक्तीला देखील शिक्षा होईल.

सरकारने काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी सुरु केलेल्या मोहीमेनंतर काळा पैसा साठवणा-यांना चांगलाच धक्का बसला आहे. काळा पैसा धारक सामान्य नागरिकांचा फायदा उचलून त्यांच्या बँक खात्यात आपले पैसे जमा करत आहेत त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.

Leave a Comment