सहकारी बँकांमध्ये आठ दिवसात पडला पैशाचा पाऊस

note
पुणे – राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी सहकारी बँकांमध्येही दररोज हजार-पाचशेच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपयांचा भरणा होत आहे. अवघ्या आठ दिवसांत एकट्या पुणे जिल्ह्यातल्या नागरी सहकारी बँकांमध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भरणा झाला आहे. एवढी मोठी रक्कम ठेवण्यासाठीही अनेक बँकांकडे जागा नसल्याचे चित्र आहे.

सुमारे १५७५ नागरी सहकारी बँका देशात कार्यरत आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात नऊशेपेक्षा जास्त नागरी सहकारी बँकांच्या शाखा आहेत. या बँकांच्या ठेवीदारांची संख्या ७५ लाख असून ४२ हजार कोटींच्या ठेवी आहेत. या बँकांचा कर्जव्यवहार २८ हजार कोटींच्या घरात आहे. आता एवढा मोठा व्यवहार नोटाबंदीनंतर मात्र अडचणीत आला आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय ढेरे आणि मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते यांनी या संदर्भातल्या अडचणी केंद्र आणि राज्य सरकारपुढे मांडल्या आहेत. तब्बल हजार कोटींचा भरणा गेल्या आठ दिवसांत आल्यानंतर एवढी रोकड ठेवण्यासाठीही नागरी बँकांकडे जागा उपलब्ध नाही. यामुळे बँकांमध्ये रोख शिल्लक ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेचेही उल्लंघन होत आहे. शिवाय रोकड ठेवण्यासाठी काढलेला विमाही कमी पडत आहे, अशी अडचण संघटनेने व्यक्त केली.

ठेवी वाढल्याने त्यावर व्याज द्यावे लागणार आहे. मात्र, या रकमेची गुंतवणूक होत नसल्याने बँकांना कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे ठेवीदारांना द्यायच्या व्याजाची रक्कम कुठून आणायची, हा प्रश्नही नागरी सहकारी बँकांपुढे निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment