नोटबंदीतही या गावाचे सर्व व्यवहार सुरळीत

sabarkantha
देशभरात नोटबंदी लागू झाल्यानंतर बँका, एटीएम समोर लागलेल्या प्रचंड रांगा, लोकांचा त्रागा, हमरातुमरीच्या बातम्या दररोज झळकत असतानाच गुजराथच्या साबरकाठा जिल्ह्यातील अकोदरा गावावर मात्र नोटबंदीचा कोणताही परिणाम झालेला नाही. या गावाचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत कारण देशातले हे पहिले डिजिटल गांव आहे आणि येथील लोकांना कॅशची गरज राहिलेली नाही.

दुकानातून माल आणणे, हॉटेल, दूध पाणी खरेदीसाठी येथील ग्रामस्थांना रोख रकमेची आवश्यकता नाही कारण येथील सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीनेच केले जातात. दीड वषापूर्वी पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया योजनेखाली आयसीआयसीआय बँकेने हे गांव दत्तक घेतले आहे. येथे १५०० ग्रामस्थ असून त्यातील १२०० जणांची खाती उघडली गेली आहेत व त्यांना ऑनलाईन ट्रान्स्फर सुविधा पुरविली गेली आहे. त्यामुळे त्यांना स्मार्टफोनचीही गरज भासत नाही. ज्या अकौंटमध्ये पैसे भरायचे तो नंबर टाकून रक्कम एसएमएस केली की फंड ट्रान्स्फर होतो. १० रूपयांच्या वरचे सर्व व्यवहार या पद्धतीनेच केले जातात.

या गावातील वृद्धांना पेन्शन आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागत नाही. कुठल्याही बँकेत त्यांचे निवृत्तीवेतन जमा झालेले असले तरी आपल्या गावच्या अकौंटमध्ये ही रक्कम ते ट्रान्स्फर करून घेऊ शकतात. रोख रककम हवीच असेल तर एटीएम मधून काढता येते. या गावाची वर्षाची उलाढाल दीड कोटी रूपयांच्या वर आहे. या गावात एकच एटीएम आहे मात्र तेथेही रांगा नाहीत कारण बहुतेक सर्व व्यवहार कॅशलेस आहेत.

Leave a Comment