सहकारी बँकांवरील निर्बंध उठवा; अन्यथा उद्यापासून बँका बंद

bank
पुणे : नागरी सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध उठवण्यासंदर्भात आजच निर्णय घ्या अन्यथा उद्यापासून बँका बंद करु, असा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने दिला आहे.

सहकारी बँकांना पाचशे हजारच्या नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने सहकारी बँकांवर घातले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. व्यापारी बँकांमध्ये नागरी सहकारी बँकांचे हजारो कोटी रुपये आहेत. मात्र व्यापारी बँका सहकार्य करत नसल्याने बँका बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नोटा बदलण्याची परवानगी जिल्हा बँकांना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना केली होती. मात्र केंद्र सरकारने ही मागणी फेटाळून लावली. जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ठणकावून सांगितले. सहकारी बँकांना नोटा बदलण्याची परवानगी दिली तर या बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असा दावाही जेटलींनी केला.

१४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून रिझर्व्ह बँकेने ही बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचे जाळे नसल्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. शिवाय काल शिवसेनेने यासंदर्भात राष्ट्रपतींकडे मागणी केली. मात्र सरकारने सर्वांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.

Leave a Comment