चेन्नईकरांना ‘ट्रम्प दोसा’ची भुरळ

dosa
चेन्नई : रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील निवडणुकीत विजयी झाले आणि राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. फक्त अमेरिकेतच डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते नाहीत, तर भारतातही ट्रम्प समर्थक दिसून येत आहेत. ट्रम्प यांच्या विजयामुळे उत्साहित होऊन तामिळनाडूतील रामापूरमच्या एका रेस्टॉरंट मालकाने चक्क ‘ट्रम्प दोसा’च सुरू केला आहे. सध्या हा चर्चेचा विषय आहे.

ट्रम्प यांचे रामपूरमजवळच्या वल्लुवर सलाई येथील रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास हे चाहते आहेत. त्यांनी ट्रम्प विजयी झाल्यामुळे आता ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘व्हाईट दोसा’ हा नवा मेन्यू सादर केला आहे. केळीच्या पानावर गरम गरम दोसा, सोबत सांबर, चटणी, लोणी आणि चवीला आणखीही बरंच काही मिळत आहे. ५० रुपये ऐवढी या दोशाची किंमत आहे. रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास म्हणतात की, मी ट्रम्प यांचा चाहता आहे. ट्रम्प जिंकावे असे मला नेहमीच वाटायचे. मी तर असे ठरविलेही होते की, ट्रम्प जिंकले तर त्यांच्या नावाने एखादा उपक्रम सुरू करीन.

रेस्टॉरंटच्या समोरील भागातच दास यांनी ‘ट्रम्प स्पेशल’ असा फलकही लावला आहे. या उत्सुकतेतून अनेक जण रेस्टॉरंटला भेट देत आहेत. येथील मार्केटिंग मॅनेजर विपिन पुरुषोत्तम यांनी सांगितले की, दिवसभरात १३० दोशांची येथे मागणी आहे. शहरातील हे जुने हॉटेल असून, त्याच्या सहा शाखा आहेत. काही हितचिंतकांनी ‘ट्रम्प दोसा’ या नावावर आक्षेप घेत हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो, असे सांगितले; पण दास हे आपल्या निर्णयावर ठाम होते.

Leave a Comment