दोन हजारची नवीन नोट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद

note
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेली दोन हजारांची नोट सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनली असून उच्चस्तरीय सुरक्षेचा विचार करून तयार करण्यात आलेली ही नोट रंगरूपानेही तितकीच सुंदर आहे. या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे या नोटेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील काही भित्तिचित्रांच्या प्रतिकृतीही मुद्रित करण्यात आल्या आहेत.

गांधीजींचा फोटो गुलाबी रंगाच्या या नोटेवर मध्यभागी घेण्यात आला आहे, तर मागील बाजूस मंगलयानाची प्रतिकृती छापण्यात आली आहे. त्या खालोखाल अजिंठा लेणीतील तीन भित्तिचित्रांची प्रतिकृती सलगपणे छापण्यात आली आहे. हत्ती, मोर आणि कमळाचे फूल अशी ही चित्रे आहेत. ही चित्रे लेणीमधील सभामंडपाच्या छतावर काढलेली आहेत.

जागतिक वारसास्थळाचा दर्जा युनोस्कोने बहाल केलेली अजिंठा लेणी जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. जपानसह अनेक देशांतील पर्यटक दरवर्षी या लेणीला भेट देत असतात. या लेणींमध्ये भिंतीवर साकारण्यात आलेली चित्रे पर्यटकांना भुरळ पाडतात. यापैकीच काही चित्रे आता दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांसोबत राहणार आहेत. यातून वेळोवेळी अजिंठा लेणीतील चित्रांचे दर्शन घडत राहील.

Leave a Comment