मायक्रो एटीएम घरी येऊन देणार पैसे

micro
नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या बातम्या दररोजच वाचायला मिळत असतानाच सरकारने नोटबंदीचा त्रास सोसाव्या लागलेल्या नागरिकांसाठी एक सुखदायक व दिलासा देणारी योजनाही हाती घेतली आहे. त्यानुसार यापुढे नागरिकांना बँका अथवा एटीएमसमोर रांगा लावण्याची वेळ येणार नाही कारण एटीएमच नागरिकांच्या दाराशी येऊन त्यांना पैसे देणार आहे.

अर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तीकांत दास यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले लवकरच मायक्रो एटीएममधून ग्राहकांना कॅश मिळू शकेल व त्यासाठी घरातून बाहेर पडण्याची गरज नाही कारण ही मायक्रोएटीएम घरोघरी जाणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात हे काम प्राधान्याने केले जाणार आहे. यात बँकेचे अधिकारी घरोघरी ही मशीन्स घेऊन जातील व आपल्या नेहमीच्या एटीएम प्रमाणेच यातून डेबिट, क्रेडीटच्या सहाय्याने कॅश मिळविता येईल. हे छोटे मशीन वापरासाठी सुलभ व सुरक्षित आहे कारण पैसे काढताना ग्राहकाला कार्ड स्वाईप करावे लागेल तसेच अंगठ्याचा ठसाही द्यावा लागेल. यामुळे दुसरी व्यक्ती तुमच्या खात्यातील पैसे काढू शकणार नाही.

पैसे काढताना अन्य एटीएमप्रमाणेच चार आकडी पिन नंबर द्यावा लागेल व पैसे काढल्याची रिसीटही त्वरीत मिळेल. बँक अधिकारी तशी नोंद पासबुकातही करून देतील.

Leave a Comment