तणावपूर्ण जीवनाचे बळी

dibeates
मधूमेह म्हणजेच डायबेटिस हा श्रीमंत लोकांचा विकार आहे असा फार पूर्वीचा गैरसमज भारताने दूर केला आहे आणि सामान्य स्थितीतल्या लोकांना हा विकार होऊ शकतो हे भारतीयांनी दाखवून दिले आहे. भारत हा गरिबांचा देश असतानाही मधूमेहाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अर्थात, आरोग्याच्या क्षेत्रात भारताला जगाची मधूमेहाची राजधानी म्हटले जायला लागले आहे. याही गोष्टीला आता बरेच दिवस झाले. दोन दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय मधूमेह दिन पाळण्यात आला आणि या निमित्ताने भारत आणि मधूमेह यांच्या संबंधातील धक्कादायक माहिती समोर आली. भारतात शहरी भागामध्ये दर तिघांपैकी एकाला तर ग्रामीण भागात दर चार ते पाच जणांमागे एकाला मधूमेह होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता येत्या दहा-पाच वर्षात सत्यात उतरलेली असेल, असे निष्कर्ष आता निघत आहेत. हे धोक्याचे इशारे कमी झाले म्हणून की काय पुण्याच्या काही संशोधन संस्थांमधून यापेक्षाही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून मधूमेहाच्या संबंधात एक विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेवून संशोधन केले जात आहे आणि आलेल्या रूग्णांच्या नोंदी ठेवून मधूमेह होण्याच्या संबंधातील प्रवाहांचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासामध्ये असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे की पुण्यामध्ये साधारण विशीतल्या तरुणांनाच मधूमेह होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. मधूमेह हा आनुवांशिक विकार आहे. ज्याच्या आईवडिलांना अथवा आई किंवा वडिलांना मधूमेह असेल त्यांना हा विकार आयुष्यात कधी ना कधी गाठतोच. परंतु अशा लोकांनासुध्दा मधूमेहाची बाधा चाळीशीच्या आसपास होत असते. आईवडिलांना मधूमेह नसतानासुध्दा काही लोकांना तो होतो. मात्र तो वृध्दत्वाकडे झुकत असताना पहिल्यांदा आढळतो. म्हणजे कोणत्याही प्रकाराने का असेना पण मधूमेह बळावण्याची शक्यता चाळीशी-पन्नाशीनंतरच असते असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र आता पुण्यात विशीतले तरुणच या विकाराला बळी पडत असताना दिसत आहेत. मधूमेह हा मुळात पचनसंस्था क्षीण होण्याचा विकार आहे. अन्न नीट पचन होत नसेल किंवा अन्नातली साखर शरीरातील रक्तात शोषली जात नसेल तर मधूमेह झाला असे समजतात. वयोमानानुसार पन्नाशीनंतर पचनसंस्था दुबळी होत जाते. तसेच सतत मानसिक तणावाशी सामना केल्यामुळे त्या तणावाचा संकलित परिणाम चाळीशी-पन्नाशीत दिसायला लागून त्याचा परिणाम अन्नपचनावर आणि पर्यायाने मधूमेह होण्यावर होतो.

मात्र हा सारा परिणाम आता विशीतच व्हायला लागला तर ते चिंतेचे कारण ठरेल. एका बाजूला आपण देशातल्या तरुणांची संख्या मोठी असल्यामुळे देश महाशक्ती होणार असे दावे करत आहोत. परंतु देशात तरुणांची संख्या केवळ मोठी असल्यामुळे देश महाशक्ती होत नसतो तर ती संख्या सक्षम आणि सुदृढ असली पाहिजे तरच महाशक्ती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मात्र शहरात राहणारे तरुण अजून तिशी गाठण्याच्या आतच मधूमेहाला बळी पडायला लागले तर देशाला महाशक्ती कोण बनवणार आहे? पुण्यातल्या संशोधनात आढळलेली आणखी एक बाब म्हणजे साधारण विशीतल्या तरुणी पहिल्यांदा गरोदर होतात तेव्हा त्यांना मधूमेह गाठायला लागतो. म्हणजे विशीत मधूमेह होणार्‍या तरुणांमध्ये एक मोठा वर्ग गर्भवती तरुणींचा आहे. अशा मुलींच्या पोटी जन्माला येणारी बालके जन्मतःच मधूमेह सोबत घेऊन जन्माला येतात. काही सुदैवी बालकांना जन्मतःच मधूमेह होत नसला तरी त्यांना पुढे कमी वयात मधूमेहाची बाधा होण्याची शक्यता असते.

याचा अर्थ विशीतले तरुण किंवा तरुणी मधूमेहग्रस्त होत असतील तर त्यांची पुढची पिढी विशी गाठण्याच्या आतच मधूमेहग्रस्त होते. ही खरी चिंतेची बाब आहे. म्हणजे विशीतले मधूमेहग्रस्त तरुण किंवा तरुणी केवळ स्वतःच मधूमेहग्रस्त आहेत असे नाही. तर फार लहान वयात मधूमेह होणार्‍या पिढीला जन्म देणारी ती पिढी आहे. यावर काहीतरी इलाज केला गेलाच पाहिजे आणि तो करण्यासाठी या धोक्यामागच्या मूलभूत कारणांचा शोध घेतलाच पाहिजे आणि तो घेतला असता असे आढळून येते की या तरुण मधूमेही पिढीला त्यांच्या बालपणात झालेले अतिपोषण कारणीभूत आहे. आज समाजात समृध्दी वाढत चालली आहे आणि तिच्या वाढीसोबत मुलांचा पॉकेटमनीही फुगत चालला आहे. पॉकेटमनी वाढलेली ही मुले फास्टफूडकडे वळतात आणि त्यातून ही सारी अनर्थ परंपरा जन्माला येते. म्हणून आता सरकारच्या पातळीवरही चरबीयुक्त पदार्थ आणि फास्टफूड खाण्याच्या संबंधात तरुण पिढीचे प्रबोधन करावे असा विचार केला जायला लागला आहे. फास्ट फूडमुळे होणारे धोके मुलांना समजून सांगावेत म्हणून सरकार काही योजना आखण्याच्या विचारात आहे. केरळ राज्य सरकारने तर अशा खाद्यपदार्थांवर फॅट टॅक्स या नावाने एक नवा कर बसवला आहे. या संबंधात इतरही राज्य सरकारांमध्ये विचार सुरू झाला आहे. लहान मुलांच्या आहाराच्या बाबतीत प्रबोधन करणे जसे गरजेचे आहे तसे खाल्लेले अन्न पचावे म्हणून त्यांना भरपूर खेळण्यास प्रवृत्त करणेही गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *