आजारी गाय मालकाला पाठविणार मेसेज

ajar
गोठ्यातील जनावरांनाही माणसांसारखे आजारपण येऊ शकते पण माणसासारखे त्यांना काय होतेय हे सांगता येत नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने मात्र आता ही मुकी जनावरे त्यांना नक्की काय होतेय याचा मेसेज मालकांपर्यंत पोहेाचवू शकणार आहेत. सुमारे २४ देशांत ही प्रणाली राबविली गेली आहे व ऑस्ट्रीयातील स्टार्टअप स्माएक्स टेक या कंपनीने ती विकसित केली आहे. यामुळे शेतावर असलेल्या गाईंच्या आजारपणासंदर्भातले सर्व अहवाल घरबसल्या गायमालकांना मिळू लागले आहेत.

या प्रणालीत गाईच्या पोटात एक सेन्सर बसविला गेला आहे. हा सेन्सर गाईच्या आरोग्यातील सर्व बदल, तिला होऊ शकणार्‍या आजारांची माहिती, संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता अथवा आजार झाला असेल तर त्याचीही माहिती मालकाला देईल. गाय वेतासाठी म्हणजे गर्भधारणेसाठी कधी तयार आहे अथवा बछडा कधी जन्माला येणार याचीही माहिती हा सेन्सर देतो व ही माहिती ९५ टक्के अचूक असल्याचेही दिसून आले आहे. हा सेन्सर वायरलेस आहे व तो अमेरिकन खाद्यपदार्थ हॉट डॉगच्या आकाराएवढा आहे.

केंब्रिज विद्यापीठाने असे सेन्सर बसविलेल्या गाईंचे सर्वेक्षण केले असून कोणताही संसर्गजन्य रोग होण्याअगोदर व झाल्यानंतरचीही सर्व माहिती हा सेन्सर देत असल्याचे त्यात दिसून आले आहे. यामुळे गायमालकांचा पैसा व वेळ वाचतो आहे. या सेन्सरची किमत १० डॉलर्स असून तो १.४ अब्ज दुभत्या पशुंसाठी योग्य असल्याचेही जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment