हवाईदलाची आठ फायटर्स एकाचेवळी करणार हायवे लँडिग

highway
आग्रा लखनौ या एक्स्प्रेस वे चे उद्घाटन खास पद्धतीने केले जाणार आहे. २१ नोव्हेंबर ला होणार्‍या या उद्घाटन समारंभात भारतीय हवाई दलाची आठ लढाऊ विमाने या हायवेवर एकाचवेळी लँडींग आणि टेकऑफ घेणार आहेत. भारताच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडत आहे. यापूर्वी मे मध्ये यमुना एक्स्प्रेस वे वर मिराज २००० लढाऊ विमानाने यशस्वी लँडींग केले होते मात्र यावेळी सु ३० सह आठ लढाऊ विमाने आग्रा लखनौ हायवेवर उतरतील व पुन्हा टेक ऑफ घेतील.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २१ नोव्हेंबर हा त्यांच्या वडीलांचा म्हणजे मुलायमसिंग यांचा जन्मदिवस त्यांना वेगळी भेट देऊन साजरा करणार असल्याचे जाहीर केले होते. हा रस्ता रेकॉर्डब्रेक वेळात तयार करण्यात आला असून ३०२ किमीचा हा रस्ता २१ महिन्यात पूर्ण केला गेला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १३.२०० कोटी रूपये खर्च आला असून डिसेंबर पर्यंत तो पूर्णपणे कार्यरत होणार आहे.

उत्तरप्रदेश हायवे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे सीईओ नवनीत सेहगल म्हणाले की देशात प्रथमच एकावेळी आठ फायटर जेट एक्स्प्रेसवे वर उतरविली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व सोय केली गेली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत देशातील एकस्प्रेस वे रनवे सारखे वापरता यावेत या दृष्टीने तयार केले जात असून ही त्याची चाचणीच आहे. जर्मनी, पोलंड, स्वीडन, द.कोरिया, तैवान, फिनलंड, स्वित्झर्लंड, सिगापूर, पाकिस्तानात यापूर्वीच हायवेंचा वापर रन वे म्हणून करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

Leave a Comment