रंग न जाणारी दोन हजारची नोट बनावट

shaktikanta-das
नवी दिल्ली – नव्याने नागरिकांच्या हाती आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेचा रंग जात असल्याने तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र नोटांचा रंग जाण्यात चुकीचे काहीच नसल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी स्पष्ट केले. दोन हजारच्या नोटेचा रंग गेला नाही तर ती बनावट नोट समजावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. दास यांना या पत्रकार परिषदेत दोन हजार रुपयाच्या नोटेचा रंग जात असल्याच्या तक्रारींविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर दास म्हणाले, दोन हजारच्या नोटसाठी इंटेक्विओ शाई वापरण्यात आली आहे. या शाईचा गुणधर्मच तसा असतो. म्हणून त्यांचा रंग जात असतो. पण समजा त्या नोटेचा रंग जात नसेल तर ती बनावट असल्याचे समजावे असे त्यांनी सांगितले. जुन्या शंभर, पाचशेच्या नोटांमध्येही हीच शाई वापरली जात होती असे त्यांनी नमूद केले.

पाचशे आणि हजारच्या नोटा गेल्या आठवड्यात रद्द करुन त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारपेठेत आणण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. बाजारपेठेत दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा दाखलही झाल्या आहेत. पण या नवीन नोटांना पाण्याचा हात लागला तरी त्या नोटांचा रंग जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पावसाळ्यात या नोटा वापरणे शक्य आहे का असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर काही जणांनी या नोटांच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केले होते. कागद आणि शाईचा दर्जा निकृष्ट असावा आणि त्यामुळेच या नोटांचा रंग निघत असावा असे सांगितले जात होते. याप्रकरणी नाशिकमध्ये थेट पोलिसांकडेच तक्रार दाखल करण्यात आली होती. आता खुद्द अर्थसचिवांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने रंगावरुन निर्माण झालेला वाद संपुष्टात आला आहे.

Leave a Comment