नव्या वर्षात चालणार नाही व्हॉट्सअॅपची ‘वटवट’!

whatsapp
मुंबई – व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या अनेक जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनधारकांनाही जानेवारीपासून नवे मोबाइल घ्यावे लागणार आहेत. कारण व्हॉट्सअॅपने आपल्या चॅट अॅपमध्ये नवीन फीचर्स आणल्याने अनेक जुन्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. आपल्या साइटवर याची माहिती देताना व्हॉट्सअॅपने विंडोज आणि अँड्राइड फोनची यादी देऊन यावर हे अॅप वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. देशात जवळजवळ ९५ टक्के स्मार्टफोनधारक हे व्हॉट्सअॅप वापरत आहेत.

सध्या जगातील प्रत्येक सात व्यक्तींमागे एक व्यक्ती व्हॉट्सअॅप हे चॅट अॅप वापरत आहे. या चॅट अॅपने संपूर्ण जगाला वेड लावले असून आजची तरुणाई याशिवाय राहूच शकत नाही, अशी स्थिती आहे. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहून अनेक चॅट अॅप बाजारात आले. मात्र, त्यांना व्हॉट्सअॅपला टक्कर देणे जमले नाही. बदल केले नाहीत तर बाजारातून बाहेर पडावे लागेल हे लक्षात आल्याने व्हॉट्सअॅपने नवीन हेवी आणि हायटेक फीचर्स तयार केले असून ते बीटा प्लॅटफॉर्मवर आहेत. हे अपडेट कॅमेरा आणि फोटोसाठी आहेत. यात फोटो एडिटिंगसह व्हिडिओ एडिटिंगची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन फीचर्स अपडेट करावे लागणार आहेत. मात्र, सर्वच स्मार्टफोनधारक या फीचर्सचा वापर करू शकणार नाहीत.

व्हॉट्सअॅपवर एखादा फोटो काढून फोटो पाठवायचा असल्यास फोटोवर क्रॉपसह अन्य पर्याय दिसतील. यात स्मायली, टेक्स्ट आणि पेन्सिल आहे. फोटोत स्मायली वापरता येणार असून टेक्स्टही टाइप करता येणार आहे. पेन्सिलच्या माध्यमातून डुडल तयार करता येईल. तसेच व्हॉट्सअॅपने फ्रंट फ्लॅश हे फीचरही आणले आहे. अंधुक प्रकाशात चांगला सेल्फी घेण्यासाठी फ्रंट फ्लॅश हे फीचर अपडेट करण्यात येईल. हे अपडेट सध्या बीटा व्हर्जन २.१६.२६४ वर उपलब्ध आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयफोन, नोकिया, सिंबियन, विंडोज ७.१, ब्लॅकबेरी आणि अँड्राइड २.१ ऑपरेटिंग सिस्टिमवर हे अपडेटेड अॅप चालणार नाही. या यादीत सिंबियन सोबत ब्लॅकबेरी, नोकियाची S४० सिरीज , नोकिया सिम्बियन s६०, अँड्रॉइड २.१, अँड्रॉइड २.२ आणि विंडोज फोन ७.१ ओएसवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा समावेश आहे. आयफोन ३ जीएस आणि आयओएस ६, ब्लॅकबेरी, ब्लॅकबेरी १०, नोकिया ई ६, नोकिया सी ५,नोकिया आशा ३०६, नोकिया ई २, नोकिया एस ४०, नोकिया सिंबियन एस ६० या ऑपरेटिंग सिस्टिमवर नवीन अपडेटेड व्हॉट्सअॅप अॅप चालणार नाही.

Leave a Comment