ल्यूसर्नचे डाईंग लायन मॉन्युमेंट

lion1
स्वित्झर्लंड हा देशच एक पर्यटन स्थळ आहे. या देशात इतक्या विविध जागा पर्यटकांसाठी आहेत की पुरा देश पाहायचा म्हटले तर कित्येक दिवस लागतील. अर्थात या देशात कधी पर्यटनाला गेलातच तर ल्यूसर्नचे डाईंग लायन शिल्प पहायला विसरू नका.

हे शिल्प म्हणजे दगडात कोरलेले सर्वात मोठे जिवंत दुःख असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन याने व्यक्त केली होती. १७९२ च्या फ्रेंच राज्यक्रांतीत राजाचे संरक्षण करताना विरोधकांच्या नरसंहारात बळी पडलेल्या स्विस गार्डच्या सन्मानार्थ एका स्विस गार्डनेच हे शिल्प उभारले आहे. हा गार्ड त्यावेळी सुटीवर होता व म्हणून तो जिवंत राहिला. ३३ फूट लांब व २० फूट रूंदीची सिंहाची ही प्रतिमा दगडाच्या खाणीतील भिंतीवर कोरली गेली आहे. या स्मारकाचे श्रेय जाते स्विस गार्ड कार्ल फायफर अल्टीशोफेन याच्याकडे.

lion
ही प्रतिमा कोरण्याचे काम १८१८ साली सुरू झाले व ते १८२१ ला संपले. डॅनिश शिल्पकार थोडवॉल्डसन याने त्याचे डिझाईन तयार केले तर प्रत्यक्ष काम लुकास अहोर्न याने केले. फ्रान्सचा राजा लुई १६ वा याच्या काळात फ्रान्समध्ये क्रांती झाली ती रक्तक्रांती म्हणून ओळखली जाते. या राजाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या स्विस गार्डचा अक्षरशः नरसंहार केला गेला मात्र तरीही त्यांनी राजा व कुटुंबियांना सुरक्षित पलायन करण्याची संधी मिळवून दिली. हा नरसंहार पॅरिस मध्ये १० ऑगस्ट १७९२ मध्ये घडला त्या स्मृतीनिमित्त हे स्मारक उभारले गेले व त्याला टू द लॉयल्टी अॅन्ड ब्रेव्हरी ऑफ स्विस गार्ड असे नांव दिले गेले. ही खाण पूर्वी खासगी मालकीची होती मात्र नंतर ती ल्यूसेन गावाने १८८२ साली खरेदी केली.या स्थळाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात व पर्यटकांचे हे आकर्षण बनले आहे.

Leave a Comment