तस्कर शंभराच्या बनावट नोटा छापण्याच्या तयारीत

new-notes
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या नोटा चलनातून काढून टाकून बनावट नोटा चलनात आणणारे तस्कर, लाचखोर आणि काळा बाजारवाल्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला असला तरीही आता १०० रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याची तयारी तस्करांनी सुरू केली असून त्यासाठी पाकिस्तानात यंत्रणा कामाला लागल्याची माहिती गुप्तचार संस्थांनी दिली आहे.

सीमेवरच्या चकमकी, दहशतवाद्यांना फूस या प्रमाणेच भारतीय चलनात बनावट नोटांचा सुळसुळाट करून काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचा; अर्थात भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा पाकिस्तानचा नेहेमीच प्रयत्न असतो. त्यामुळे पाकिस्तानातून बनावट नोटा छापून त्या नेपाळ व अन्य मार्गांनी भारतात पाठविणे ही नित्याचीच बाब आहे.

मात्र मोदी यांनी ५०० आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर या उचापती करणाऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. मात्र नव्याने चलनात आलेल्या ५०० व २ हजार नोटांच्या सुरक्षिततेसाठी आणि सत्यता तपासण्यासाठी अधिक काटेकोरपणे काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे या नोटांची बनावट नक्कल करणे तुलनेने कठीण आहे.

अर्थात त्यामुळे पाकिस्तान आणि बनावट नोटांचे तस्कर हतबल होऊन गप्प बसतील अशी शक्यता नसल्याचेच गुप्तचर यंत्रणांच्या या माहितीतून उघड झाले आहे. आता शंभर अथवा त्यापेक्षा कमी रकमेच्या बनावट नोटा छापण्याचे प्रयत्न पाकिस्तानात सुरू आहेत.

Leave a Comment