भारतातील नोटा रद्दचा शेजारी देशांवरही परिणाम

pardesh
काळ्या पैशांवर अंकुश मिळविता यावा या हेतूने मोदी सरकारने चलनातून ५०० व १हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्याचा परिणाम केवळ भारतातच नाही तर शेजारी देशांवरही पडत असल्याचे दिसून आले आहे. बांग्लादेश, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, म्यानमार, बहारिन, कतार तसेच संयुक्त अरब अमिराती देशांवरही हा परिणाम जाणवू लागला आहे. या देशांचे भारताशी व्यापार आहेत तसेच या देशातून भारतीय नागरिकांची संख्याही मोठी आहे.

बांग्लादेशाच्या बीडी न्यूज २४ नुसार बांग्लादेशातील अनेक रूग्ण इलाजासाठी भारतात येतात त्यांना नोटा रद्द पॉलिसीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हे लोक सीमा भागात बांग्ला चलन टका रूपयांत बदलून घेतात मात्र नव्या नोटांचा पुरेसा पुरवठाच नसल्याने हा विनिमय करण्यात अडचणी येत आहेत. नेपाळमध्ये राष्ट्रीय बँकेने सर्वच भारतीय नोटा सध्या बॅन केल्या आहेत त्याचा मोठा परिणाम व्यवसायावर पडला आहे. नेपाळमध्ये सद्यस्थितीत १३ कोटी ५० लाख रूपयांच्या भारतीय नोटा वापरात आहेत.

म्यानमारमधील व्यापारी वर्गानेही या नोटा रद्द पॉलिसीवर नाराजी व्यक्त केली आहे. म्यानमारमध्ये या निर्णयामुळे मुद्रा विनिमय दर कोसळला आहे. सीमाभागात व्यापारी मंडालेतील माल सीमापार भारतीय व्यापार्‍यांना देतात व हा व्यवहार रूपयांत पूर्ण होतो. मात्र रूपयाचा दर कोसळल्याने या व्यापार्‍यांना मंडालेतील ग्राहकांकडील रूपये कयात मध्ये बदलावे लागणार आहेत. सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हे नागरिक रद्द झालेल्या नोटा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र बँक व मनी चेंजर्स या नोटा घेण्यास नकार देत आहेत. मलेशियातून अनेक पर्यटक भारतात येतात त्यांनाही भारतीय चलन मिळण्यात अडचणी येत आहेत. तर अरब देशात असलेल्या एसबीआय व बँक ऑफ बडोदाच्या शाखांतूनही रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे समजते.

Leave a Comment