मोदींना एका दिवसात तब्बल तीन लाख जणांनी केले अनफॉलो

modi
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर सर्वत्र कौतुक होत आहे. पण ट्विटरवर मात्र याऊलट चित्र दिसून आले आहे. नोट बंदीच्या निर्णय जाहीर केल्याच्या दुस-या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी मोदींना एका दिवसात तब्बल तीन लाख जणांनी अनफॉलो केले आहे. नोट बंदीमुळे होणा-या त्रासामुळेच मोदींना एकाच दिवसात ऐवढ्या लोकांनी अनफॉलो केले की काय अशी चर्चादेखील आता रंगू लागली आहे.
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केले. यानंतर दुस-या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी दिवसभरात तब्बल तीन लाख लोकांनी मोदींनी अनफॉलो केल्याची माहिती ‘कॅचन्यूज’ या इंग्रजी संकेतस्थळाने दिली आहे. हे वृत्त ट्विटरच्या अॅनेलिटीकल सेंटरमधून मिळालेल्या माहितीवरुन देण्यात आले आहे. देशात सर्वाधिक फॉलोअर असलेल्या यादीत मोदींनी अमिताभ बच्चन यांना मागे टाकून अव्वल स्थान गाठले होते. नोव्हेंबरमध्येही मोदींना फॉलो करणा-यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत होती. नोव्हेंबरमध्ये दररोज सरासरी २५ हजार नवीन युजर्स मोदींना फॉलो करत होते. ८ नोव्हेंबर रोजी मोदींनी नोटबंदीची घोषणा करण्यापूर्वीही तेवढेच प्रमाण होते. मात्र ९ नोव्हेंबरला दिवसभरात ३ लाख १३ हजार युजर्सनी मोदींना अनफॉलो केल्याचे समोर आले.

ट्विटर फेक अकाऊंट्स डिलीट करत असल्याने अचानक ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अनफॉलो करणा-यांची संख्या वाढली असा अंदाजही काही जाणकारांनी व्यक्त केला. पण यामध्येही तथ्य नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या दोघांच्या फॉलोअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे समोर आले आहे.

नोटबंदीमुळे मोदींना अनफॉलो करणा-यांचे प्रमाण वाढले असेल तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. काळा पैशावर निर्बंध घालण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सुरुवातीला सर्वसामान्यांनीही याचे स्वागत केले. पण दुस-याच दिवसापासून बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले. तसेच छोटे दुकानदार, शेतकरीपासून गृहिणींपर्यंत सर्वांचेच या निर्णयामुळे हाल होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरची ही नाराजी आता आगामी विधानसभा निवडणुकीत मतपेटीतूनही व्यक्त होईल की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment