नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांचा ओव्हरटाइम!

bank
पुणे- ५०० आणि १००० च्या नोटा केंद्र सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी बंद केल्यानंतर २४ तासांसाठी आर्थिक व्यवहार काहीसे गडबडले होते. सर्व आर्थिक व्यवहार एक दोन दिवसात सुरळीत होतील असे सरकारने म्हटले होते. त्यानुसारच सर्व आर्थिक व्यवहारांची गाडी रुळावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. एरवी काटेकोरपणे वेळा सांभाळणाऱ्या बँका काल रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या दिसल्या.

बॅंकांचे कर्मचारी आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत बॅंका सुरू होत्या. अर्धा एक तास नव्हे तर तब्बल आपल्या कामाच्या वेळेपेक्षा सहा सात तास अधिक बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी काम करुन आपल्या ग्राहकांना सेवा पुरविली. पुण्यातील लक्ष्मी नारायण चौकातील बॅंक ऑफ इंडियाची शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हे शहरातील बॅंकांचे एक प्रतिनिधीक उदाहरण ठरावे. शहरातील बॅंका पुण्याच्या जवळील ग्रामीण भागातही बॅंकांमध्ये तितकीच वर्दळ पाहायला मिळाली.

वडगाव शिंदे येथील कॅनडा बॅंक नेहमीपेक्षा उशिरा बंद झाल्याची माहिती बॅंकेचे कर्मचारी सुमित पिंपळे यांनी दिली. ही शाखा ग्रामीण भागातील असल्यामुळे येथे वर्दळ कमी असते. या शाखेत दररोज ५०-६० ग्राहक सेवा घेण्यासाठी येतात परंतु काल मात्र किमान ३०० जण आपले पैसे जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी आल्याचे पिंपळेंनी सांगितले.

सकाळी लवकर बॅंका उघडल्या त्यानंतर ग्राहकांनी आपल्या नोटा बदलून घेणे आणि रोकड जमा करणे हे काम सुरू झाले. नोकरदार वर्गाला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान बॅंकेत येणे गैरसोयीचे ठरले असते त्यामुळे सायंकाळनंतरही ग्राहकांची रीघ सुरुच होती. रात्री उशिरा नोटा बदलून घेतलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

Leave a Comment