नोटांनंतरचा गोेंधळ

currency
केन्द्रातले भारतीय जनता पार्टीचे सरकार काळ्या पैशांना पायबंद घालण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाणार आहे याचा अदमास न आलेल्या लोकांना मोठ्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने मोठा धक्का बसला. आपले उत्पन्न करपात्र असले तरी बिनदिक्कतपणे सरकारला न कळवता रोखीने व्यवहार करण्यास आणि करबुडवण्यास सोकावलेल्या अनेक लोकांना काल काय करावे हे काही सुचेनासे झाले. आपण काहीही केले तरी काही होत नसते, आपले खरे उत्पन्न किती आहे हे पहायला कोणी येत नाही, अशी त्यांची खात्री होती. अर्थात ती काही अनाठायी नव्हती. गेल्या साठ ते पासष्ट वर्षात कोणत्याच सरकारच्या आयकर खात्याने देशातल्या अशा लोकांचे खरे उत्पन्न किती याची कधी चौकशी केली नव्हती. त्यामुळे काहीही होत नाही हा त्यांचा ग्रह काही चुकीचा नव्हता. त्यांना काल जमालगोटाह बसला खरा पण तरीही त्यातल्या अनेकांनी याही उपायातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न नेहमीच्या सवयीनुसार केलाच.

काही लोकांनी गरिबांना हाताशी धरून आपला काळा पैसा त्यांच्या खात्यात भरण्याचा आणि नंतर त्यांच्याकडून तो घेऊन तो पांढरा करण्याचा प्रयत्न केला पण याही पळवाटेला सरकारने आधीच शह दिला होता. अशा रितीने दुसर्‍यांचा काळा पैसा आपल्या खात्यावर जमा करून तो पांढरा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो त्यांच्या अंगलट येईल आणि अशा रितीने आपल्या खात्यावर हे पैसे जमा करताना आपल्याला ओळखपत्र दाखवावे लागेल असा सज्जड दम सरकारने या लोकांना दिला. तसे संदेश अनेकांच्या मोबाईल फोनवर आले आणि अशा गरीब लोकांनी दुसर्‍यांचा पैसा पांढरा करण्यासाठी बळी होण्याचे नाकारले. पळवाट शोधून आपला अवैध पैसा काही प्रमाणात का होईना वैध करण्याचा या लोकांचा प्रयत्न सपशेल फसला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता नोटा बंद होणार असल्याची घोषणा केली आणि या घोषणेनंतर चारच तासांनी या ५०० आणि हजाराच्या नोटांची किंमत शून्य झालेली असेल असे जाहीर केले. लोकांना आपल्या नोटा वैध करण्यास केवळ चार तासांचा अवधी मिळाला. एवढ्या अल्प काळात या संबंधात नेमके काय करावे याचा त्यांना नीट निर्णयही करता आला नाही. यातल्या काही लोकांनी घाई घाईने काही युक्त्या अवलंबिल्या पण त्याही आता त्यांच्या अंगलट आल्या आहेत. त्यातल्या त्यात आपल्या जवळचा काळा पैसा झटपट सोन्यात गुंतवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते फार अडचणीत आले आहेत.

सरकार अशी क्रांतिकारक निर्णय जाहीर करते त्याच्या आधी शासनाच्या सेवेत असलेले सरकारी अधिकारी अनेक अंगांनी त्याचा विचार करीत असतात. खरे तर त्यांनी आणि सरकारने अनेकदा अशी खात्री दिली होती की, ज्यंाच्या जवळच्या मोठ्या नोटा अवैध नाहीत त्यांनी कसलीच काळजी करण्याची गरज नाही. असे आश्‍वासन असतानाही वैध संपत्ती बाळगणार्‍या काही लोकांनीही आपल्या जवळचा पैसा कसा दडवता येईल याचा विचार सुरू केला. मग अवैध पैसा बाळगणारांची तर बातच निराळी. पैसा अवैध असला तरीही तो सोन्यात गुंतवता येतो. ही गोष्ट विचारात घेऊन अशा लोकांनी आपल्या जवळच्या नोटा पिशव्यात भरून सराफाकडे धाव घेतली. आर्थिक क्षेत्रातली निरक्षरता ती अजून काय वेगळी असते? अशा घाईत सराफाकडे धाव घेणारेही अडाणी आणि सराफही अडाणी. सराफांनी काल हात धुवून घेण्याचा आविर्भाव आणून ३० ते ३१ हजाराचा भाव असलेले सोने या अडलेल्या लोकांना ४२ ते ४५ हजार रुपयांच्या भावात विकले. बक्कळ पैसा कमावला. या व्यवहारात सराफ मंडळी आता अडकली आणि सोने विकत घेऊन आपला पैसा काळ्याचा पिवळा केल्याची भावना करून घेतलेले नोटाबहाद्दर कायमसाठी अडकले.

काल रात्री असे सोन्याचे व्यवहार केलेल्या सराफांवर मोठ्या शहरात आयकर खात्याच्या धाडी पडल्या. कारण आयकर खात्याला असे काही व्यवहार होणार याची कल्पना होतीच. या धाडींमुळे आता या सराफांना काल केलेल्या जादा कमाईचा हिशेब द्यावा लागेल. कालचे व्यवहार काही पावतीने झालेले नाहीत. त्यामुळे या जादा कमाईच्या रूपाने मिळवलेल्या नोटा त्यांना एकतर फेकून द्याव्या लागतील किंवा त्या बँकांत भरल्या तर त्या नोटा कोठून आणल्या याचे स्पष्टीकरण करावे लागेल. ते करणे सोयीचे होणार नाही कारण तो पैसा अवैध आहे. तेव्हा काला ३० हजाराचे सोने ४५ हजाराच्या भावात विकताना त्यांना जे समाधान मिळत होते ते अल्यजीवी ठरणार आहे. हे जादा पैसे त्यांना पचणारे नाहीत. ज्यांनी नोटा निकाली काढून सोने घेतले त्यांनाही ते सोने आता पचणार नाही कारण सरकार काळृया पैशाच्या विरोधातली लढाई या नोटांच्या जवळ थांबवणार नाही. नोटांच्या ऐवजी सोन्यात पैसा गुंतवण्याची हुशारी करणारांना आता नोटासोबात सोन्याचाही जाब द्यावा लागणार आहे. असे सोने घरात ठेवावे तर जोखीम आहे आणि घरात धोका आहे म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले तरीही धोका आहे कारण सरकार लोकांच्या लॉकरमध्ये डोकावण्याचाही अधिकार मिळवणार आहे आणि लॉकरमध्ये लपवलेले सोने वैध आहे का हे पडताळून पाहणार आहे.

Leave a Comment