येथील देवांच्या न्यायालयात देवांनाही होते शिक्षा

keskal
न्यायालयात केवळ माणूसप्राणीच जातो असा समज असेल तर ही बातमी अवश्य वाचा. माणसाला कधी ना कधी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात व मृत्यूनंतर तर यमाच्या दरबारात त्याच्या कृत्यांचा न्याय केला जातो असे मानले जाते. मात्र बस्तर जिल्ह्यातील केशकाल नगर येथे देवांचे न्यायालय भरते व यात दोषी देवांना मंदिरातून बाहेर काढण्यापासून ते मृत्यूदंडाची शिक्षाही फर्मावली जाते. भंगाराम देवीच्या मंदिरात दरवर्षी भाद्रपदात भरणार्‍या जत्रेत या न्यायालयाचे कामकाज होते.

भंगाराम देवी ही शेकडो देवी देवतांचे आराध्य दैवत मानली जाते. त्यामुळे भाद्रपदातील जत्रेत जवळपासच्या शेकडो गावातील ग्रामस्थ आपापल्या गावातील ग्रामदैवतांसह येथे दर्शनाला येतात. त्याचवेळी ग्रामदैवतांविरोधातील फिर्यादी येथे मांडल्या जातात. येथे भाविक फिर्यादी व देवदेवता आरोपी असा प्रकार असतो. देवांच्या विरोधातील सर्व तक्रारी भंगाराम देवीला सांगितल्या जातात व सर्व तक्रारी संपल्या की येथील पुजार्‍याच्या अंगात येते व त्याच्या तोंडून देवाचा न्याय केला जातो. त्यात अपराधानुसार देवांना मंदिरातून कांही काळासाठी, कायमचे पदच्युत करण्याच्या शिक्षा दिल्या जातात तर कांही देवांना मृत्यूदंड दिला जातो. मृत्यूदंड दिलेल्या देवांच्या मूर्ती फोडल्या जातात तर मंदिराबाहेर काढण्याची शिक्षा झालेल्या देवतांना झाडाखाली त्यांच्या सर्व दागदागिने व इतर वस्तूंसह टाकून दिले जाते.

ज्या देवतांची शिक्षा पूर्ण होते अथवा ज्या देवता त्यांच्या पुजार्‍याच्या स्वप्नात जाऊन त्यांची चूक कबूल करतात त्यांची विधीवत पुर्नस्थापना मंदिरात केली जाते. देवाविरूद्ध येणार्‍या बहुतेक तक्रारी नवसास न पावल्याच्या, पशु आजारी पडल्याच्या, पीक नासाडीच्या अथवा गावात साथीचा आजार येण्यासंदर्भातल्या असतात. कारण या सर्व बाबींची सुरक्षा ग्रामदैवताने करायची असते व तशी केली नाही तर तो त्यांचा दोष मानला जातो. या यात्रेत महिलांना प्रवेश नाही तसेच यात्रेतील प्रसादही त्यांना खाता येत नाही.

Leave a Comment