३१ डिसेंबरपर्यंत एटीएम सेवा पूर्णपणे निशुल्क

atm
मुंबई – ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यामुळे सामान्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी खासगी बॅक असणाऱ्या आयसीआयसीआयने या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांकडून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत डिपॉझिट आणि एटीएमसंबंधीच्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसएमएस आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून बँकेकडून ग्राहकांना याबद्दलची माहिती दिली आहे.

आयसीआयसीआय सोबतच आणखी काही बँकांनीदेखील एटीएममधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एटीएममधून महिन्याभरात पाच व्यवहार मोफत केले जाऊ शकतात. यानंतरच्या व्यवहारासाठी बँकांकडून शुल्क आकारले जाते. मात्र अनेक बँकांकडून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत हे शुल्क आकारले जाणार नाही. लोकांना नोटा बदलून देण्यासाठी अनेक बँकांकडून अतिरिक्त काऊंटर सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आयसीआयसीआयने ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा २० टक्क्यांनी वाढवली आहे. याशिवाय डेबिट कार्डच्या माध्यमातून केली जाणारी खरेदीची मर्यादा दुप्पट केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना जुन्या नोटा बदलण्यात अडचणी येत असल्याने सर्व बँका शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांच्या सोयीसाठी बँकांनी कामकाजाची वेळ दोन ते तीन तासांनी वाढवली आहे. जुन्या नोटा जमा करण्याचे आणि एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क ग्राहकांकडून आकारले जाणार नाहीत, असे निर्णय अनेक बँकांकडून घेण्यात आला आहे. कॅनरा बँकेच्या सर्व शाखा दररोज दोन तास अधिक वेळ सुरू राहणार आहेत. तर आयसीआयसीआयच्या सर्व शाखा गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजता सुरू राहणार आहेत. तर देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत.

Leave a Comment