या देशांना स्वतःचे चलन नाही

zimbabve
भारतात काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानक ५०० व १ हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्यामुळे जी खळबळ माजली आहे त्याचे परिणाम जगाच्या आर्थिक व्यवस्थेवरही होतील असे मानले जात आहे. मात्र जगात कांही देश असे आहेत की ज्यांना स्वतःचे चलन नाही.हे देश दुसर्‍या देशांचे चलनच वापरतात.

उदाहरणार्थ जगातील छोट्या देशांच्या यादीत ३ नंबरवर असलेल्या नाऊरू या देशाकडे स्वतःची सेना नाही तसेच स्वतःचे चलनही नाही. केवळ २१३ चौ. किमीचा परिसर असलेल्या या देशाची लोकसंख्या आहे १० हजार. या देशात ऑस्ट्रेलियाची करन्सी वापरली जाते. तसेच इक्वाडोरमध्येही अमेरिकन डॉलर्स वापरले जातात. १९९९-२००० साली हा देश आर्थिक संकटात सापडला व अन्य देशांचे कर्ज फेडणेही शक्य झाले नाही कारण देशाची सर्व करन्सीच संपली होती. तेव्हापासून येथे अमेरिकन डॉलर्स स्वीकारले जातात.

झिंबावे मध्येही २००९ मध्ये अशीच आर्थिक मंदी आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील या देशाने अमेरिकन डॉलर्स व दक्षिण आफ्रिकन रँड असे विदेशी चलन वापरात आणले. पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची अर्थव्यवस्था अमेरिकेवर अवलंबून राहिली. पनामाला स्वांतत्र्यासाठी मदत करण्यात अमेरिकेचा हात होता कारण त्यांना तेथे पनामा कालवा काढायचा होता असे सांगितले जाते. जगातील दोन नंबरचा छोटा देश मोनॅको हाही अर्थव्यवस्थेसाठी फ्रान्सवर विसंबून आहे व येथे युरो चलन वापरले जाते.

Leave a Comment