मोदींच्या आर्थिक सर्जिकल स्ट्राईकमुळे तब्बल ३ लाख कोटींचा काळा पैसा नष्ट

modi
मुंबई – ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सर्जिकल स्ट्राईकमुळे देशातील तब्बल ३ लाख कोटींचा काळा पैसा नष्ट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असून या अंदाजानुसार, बेहिशेबी संपत्ती उघड होण्याच्या भीतीने अनेकजण त्यांच्याकडे असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करणे टाळतील. अर्थव्यवस्थेत असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या एकुण नोटांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने या नोटा बँकेत जमा न केल्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या निरूपयोगी ठरणार आहेत.

देशातील तब्बल तीन लाख कोटींचा काळा पैसा २० टक्के इतके प्रमाण गृहीत धरल्यास नष्ट होईल, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. टाटा अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रितेश जैन यांनी यामुळे सावकारी, गृहनिर्माण क्षेत्र, दागिने आणि अशाचप्रकारच्या संशयास्पद व्यवहारांमध्ये गुंतलेल्या बँकावर परिणाम होणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे यामुळे करव्यवस्थेत पारदर्शकता येणार असून सार्वजनिक वित्तपुरवठा वाढेल, असेही जैन यांनी म्हटले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे नुकसान होईल, हा आक्षेपही चुकीचा आहे. ग्रामीण भागात अजूनही बरेच व्यवहार रोखीने होतात. याशिवाय, ग्रामीण जनतेचा ओढा घरगुती वस्तू आणि वाहने खरेदी करण्याकडे असतो. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे हे प्रमाण कमी होऊन ग्रामीण जनता सोने आणि मालमत्तेत अशा ठोस स्वरूपांत अधिक गुंतवणूक करेल, असा विश्वास मॉर्गन स्टॅनले रिसर्चच्या चेतन अहया यांनी व्यक्त केला.

Leave a Comment