नोटाबंदीची तयारी सहा महिन्यांपासूनच

1000-500
मुंबई: एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय तातडीने अथवा अचानक घेण्यात आलेला नाही. या निर्णयाची तयारी सहा महिन्यांपासून अत्यंत गुप्ततेने सुरू होती. याबाबत मोठ्या बँकांच्या उच्चाधिकाऱ्यांनाही कल्पना देण्यात आलेली नव्हती; अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोठ्या रकमेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आयकर खात्याची अभय योजना ही याच निर्णयाची पूर्वतयारी होती.
नव्या ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईचे कामही ३ महिन्यापूर्वीपासून सुरू आहे. दोन हजार रुपयांच्या साडेतीनशे कोटी नोटा छापून तयार आहेत. सध्या याच्या दुप्पट १ हजाराच्या नोटा चलनात आहेत.

रिझर्व बँकेने अन्य बँकांना यापूर्वीपासूनच बनावट नोटांबाबत काटेकोर राहण्याच्या आणि मोठ्या नोटांच्या वापरापेक्षा १०० रुपयांच्या नोटांच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. एटीएम मध्ये देखील १०० च्या नोटा अधिक ठेवण्याचे परिपत्रक शिखर बँकेने ५ मे रोजीच जारी केले होते. त्यासाठी बँकांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याचेही निश्चित करण्यात आले होते. त्यामागे या निर्णयाचे संकेत होते; हे मात्र निर्णय जाहीर झाल्यावर लक्षात आले; असे एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दोन हजार रुपयांच्या नोटेचे छायाचित्रही समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते.

Leave a Comment