रद्द नोटा बँकांमध्ये जमा करणे ही करसवलत नाही

arun-jaitly
अर्थमंत्री अरुण जेटली यांचा कडक इशारा
नवी दिल्ली: रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकांमध्ये जमा केल्यानंतर तेवढ्या किंमतीच्या अव्य नोटा बदलून मिळणार आहेत. मात्र ही करा सवलत देणारी योजना नाही. गरज पडल्यास या रकमेचा स्त्रोत तपासून पाहण्यात येईल; असा कडक इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर प्रहार करण्यासाठी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा धडाकेबाज निर्णय घेतल्यानंतर अर्थमंत्र्यांनीही काळ्या पैशाबाबत आपले कडक धोरण अधिरेखीत केले आहे.

जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याने कोणतीही करसवलत मिळणार नाही. कायद्याने असलेली सर्व बंधने या रकमेलाही लागू असतील; असे अर्थमंत्र्यांनी सुनावले. ही रक्कम पूर्वी बँकांच्या खात्यांमधून काढलेली असेल; अथवा सरळ, कायदेशीर मार्गाने मिळविली असेल; तर त्याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. ही रक्कम लाचखोरीतून, बेकायदेशीर मार्गाने अथवा गुन्हेगारीतून मिळविलेली असेल; त्याबाबत संदेह असेल; तर या उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्यात येणार आहे; असे जेटली यांनी स्पष्ट केले.

महिला आणि शेतकऱ्यांनी अधिकृतपणे साठविलेले पैसे बँकांमध्ये भरून नोटा बदलून घेण्यात कोणतीही चिंता करू नये; असा दिलासाही त्यांनी दिला. घरखर्चासाठी घरात ठेवलेल्या रकमेच्या नोटा बदलण्यासही नागरीकांनी कचरू नये; असेही जेटली म्हणाले.

देशभरात अधिकाधिक व्यवहार डिजिटल स्वरूपात व्हावे; अधिकाधिक नागरिकांनी आपले उत्पन्न जाहीर करून त्यावर कर भरावा; भारत हे करस्नेही समाजाचे राष्ट्र बनावे; यासाठी सरकार प्रयत्नशील असून हा निर्णय गुन्हेगारी, लाच आणि अवैध मार्गांनी उत्पन्न मिळविणाऱ्यांना धडकी भरविणारा आणि प्रामाणिक नागरिकांना प्रोत्साहन देणारा आहे; असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment