कॅशबॅक सवलत हे करपात्र उत्पन्न

online-shopping
मुंबई: सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर ‘ऑनलाईन शॉपिंग’ केले जाते. ऑनलाईन व्यवहारात डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरले जाते. या व्यवहारात अनेक कंपन्या ‘कॅशबॅक’ देतात. मात्र ‘कॅशबॅक’द्वारे मिळणारी रक्कम करपात्र असून त्यासाठी मुंबईतील एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला यासंदर्भात आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे.

या नोटिशीनुसार आयकर विभाग संबंधित अधिकाऱ्याच्या खात्याची चौकशी करणार आहे. ही नोटीस मिळताच या बँक अधिकाऱ्याने आपल्या चार्टर्ड अकाऊंटंटशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या खात्यात दीड हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळाली असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम डेबिट कार्डाद्वारे केलेल्या खरेदीनंतर मिळणाऱ्या कॅशबॅक ऑफरमार्फत मिळाली आहे. या रकमेचा उल्लेख आयकर विवरण पत्रात केलेला नव्हता. ही रक्कम खूप लहान असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. या रकमेमुळेच आयकर विभागाने डिमांड नोटीस पाठवल्याचेही ते म्हणाले.

कॅशबॅक रक्कम ‘उत्पन्नाचा स्त्रोत’ म्हणूनही गणली जाऊ शकते. त्यावर कर भरावा लागतो. त्याची नोंद विवरणपत्रात न केल्यास फटका सहन करावा लागू शकतो.

Leave a Comment