स्वस्त हायब्रिड कार विकसित करणार मारुती सुझुकी

maruti
नवी दिल्ली – स्वस्त किमतीतील हायब्रिड कार विकसित करण्याचा प्रयत्न देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आणि त्याची पालक कंपनी सुझुकी मोटार करत असून देशात पर्यावरणनुकूल वाहनांची संख्या वाढत असतानाच भारतीय बाजारातील आपली स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी मारुती प्रयत्नशील आहे.

कंपनी आणि त्याची पालक कंपनी सुझुकी हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित लहान कारचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हरित तंत्रज्ञानाच्या आधारे छोटय़ा कारचा बाजार दुप्पट वाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. मात्र टोयोटा यासारख्या कंपन्या आता मोठय़ा वाहनांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. भारतात हायब्रिड तंत्रज्ञानयुक्त छोटी कार दाखल करणे हे बौद्धिकदृष्टय़ा आव्हान आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर लहान गाडय़ांमध्ये अथवा कारमध्ये कोणीही हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. या तंत्रज्ञानाचा अजून विकास करण्यात यावे असे आपणाला वाटते. यासाठी आपण काम करत असल्याचे मारुती सुझुकीचे प्रमुख आर. सी. भार्गव यांनी सांगितले. मात्र ही गाडी केव्हा बाजारात दाखल करण्यात येईल याबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सध्या मारुती सुझुकीने एर्टिगा एमपीव्ही आणि प्रीमियम सेडान प्रकारातील सियाज ही हायब्रिड प्रकारातील गाडी भारतीय बाजारात दाखल केलेली आहे.

Leave a Comment