या गावात मरायला परवानगी नाही

norway
जन्ममरण हे उपरवाल्याच्या हातात असते हे जसे खरे तसेच जो जीव जन्माला आला त्याला मरण येणारच हेही शाश्वत सत्य. इतकेच नव्हे तर आपल्याकडे असाही समज आहे, मृत्यू ज्या ठिकाणी येणार तेथे तो जीव आपोआपच पोहोचतो. पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे, जेथे मरायला परवानगीच नाही. अर्थात हा नियम मानवाने केला आहे आणि हे गांव आहे नॉवेतील लॅन्गेयरबेन. या गावाची अन्य अनेक वैशिष्ठ्येही आहेत. अमेरिकन उद्योजक जॉन लन्गेयरने या गावाचा शोध लावला व त्याच्याच नावावरून या गावाचे नांव ठेवले गेले आहे.

नॉर्वेत उत्तर ध्रुवाच्या नजीक असलेल्या स्वावलार्ड आयलंडमधील हे गाव असे एकमेव गांव आहे जेथे अतिप्रचंड थंडीतही लोक वास्तव्य करतात. येथील उणे तापमानात जगणे ही मोठी लढाई आहेच शिवाय येथे हिम अस्वलांचाही सुळसुळाट आहे. या गावची लोकसंख्या अवघी २ हजार आहे व स्नो बेअर्स म्हणजेच हिमअस्वलांची संख्या आहे तीन हजारांहून अधिक. ही अस्वले माणसांवर प्राणघातक हल्ला करतात व त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडताना रायफल बरोबर ठेवल्याशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आहे. या गावाचा शोध लावणार्‍या जॉनने १९०६ साली येथे आर्क्टिक कोल कंपनी सुरू केली तेव्हा येथे ५०० नागरिक वास्तव्यास आले मात्र येथील खाण उद्योग अन्यत्र हलविले गेल्यानंतर हे गांव पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले. येथे अनेक प्रकारचे रिसर्चही केले जातात.

या गावात चार महिने सूर्य उगवतच नाही त्यामुळे त्या काळात येथे पूर्ण काळोख असतो. येथील रस्त्यांना नांवे नाहीत तर नंबर दिले गेले आहेत. स्नो स्कूटर हेच येथील वाहतूकीचे साधन. क्वचित प्रसंगी शिप किंवा विमानही येते. या गावात मरायला परवानगी नाही. कुणी गंभीर आजारी झालेच तर त्याला त्वरीत नॉर्वेतील अन्य शहरात हलविले जाते. येथे गेल्या ७० वर्षात एकही दफन केले गेलेले नाही. येथील कब्रस्तान अगदीच लहान आहे आणि त्या काळात पुरली गेलेली प्रेते अजूनही जमिनीत विरघळलेली नाहीत इतकेच काय पण प्रचंड थंडीने ती सडलेलीही नाहीत. संशोधकांनी यातील एका डेड बॉडीतील टिश्यूचे नमुने तपासले तेव्हा त्यात अजूनही इन्फ्लूएंझाचे विषाणू जिवंत असल्याचे आढळले व त्यामुळेच येथे नो डेथ पॉलीसी राबविली गेली आहे.

Leave a Comment